
फोटो सौजन्य: YouTube
‘‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’’ या प्रभावी टॅगलाईनसह ‘आशा’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रदर्शनापूर्वीच ‘आशा’ने आपली ताकद दाखवून दिली आहे. ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार पटकावत या चित्रपटाने समीक्षकांची दाद मिळवली असून, यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
‘निर्धार’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता, जाणून घ्या चित्रपट कधी होणार रिलीज?
चित्रपटात महिलांची जिद्द, त्यांचा संघर्ष, आत्मविश्वास आणि समाजावरील जबाबदाऱ्या हृदयाला भिडतील अशा पद्धतीने मांडल्या आहेत. कथानकाच्या केंद्रस्थानी असलेली ‘आशा सेविका’ ही भूमिका रिंकू राजगुरूने साकारली आहे. तिच्यासोबत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
रिंकूची ‘आशा’ ही केवळ आरोग्य कर्मचारी नसून प्रत्येक स्त्रीचा आधार, मार्गदर्शक आणि निर्भय आवाज आहे. तिच्या नजरेतून जाणवणारा संघर्ष आणि परिस्थितीशी दोन हात करताना दिसणारी तिची ठाम भूमिका हा चित्रपटाचा मुख्य आधार स्तंभ ठरणार आहे.
दिग्दर्शक दीपक पाटील म्हणतात, “ ‘आशा’ हा फक्त आशा सेविकांचा चित्रपट नाही, तर घर सांभाळत घराबाहेर पडून स्वतःची स्वप्नं पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे. नवनवीन विषयांना नेहमीच उघड्या मनाने स्वीकारणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही अनोखी आणि संवेदनशील कथा निश्चित आवडेल.’’
‘आशा’चे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दीपक पाटील असून मुरलीधर चटवानी व रवींद्र अवटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट आगळ्यावेगळ्या कथानकाद्वारे प्रेक्षकांना एका नवे जग दाखवणार आहे.