
भाऊ आणि भाईजान पुन्हा एकत्र!
मराठी चित्रपटांचे नाव नेहमीच जागतिक पातळीवर घेतले जाते. म्हणूनच तर अनेक बॉलिवूड कलाकार देखील मराठी चित्रपटात काम करताना दिसतात. अनेक बॉलिवूड कलाकार पाहुणे कलाकार म्हणून देखील मराठी चित्रपटात निर्णायक भूमिकेत दिसतात. 2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांनी पहिल्यांदाच सलमान खानला रितेश देशमुखसोबत पहिले. या चित्रपटातील सलमान खानचा छोटासा रोल आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडचा भाऊ आणि भाईजान एकत्र दिसणार अशी चर्चा रंगली आहे.
वेड चित्रपटाच्या तुफान यशानंतर अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट म्हणजे ‘राजा शिवाजी’. विशेष म्हणजे हा ऐतिहासिक चित्रपट स्वतः रितेश देशमुख दिग्दर्शित करणार आहे. तसेच अजय-अतुल या चित्रपटाला संगीत देणार आहे. जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा समजले की हा मराठी चित्रपट फक्त मराठी भाषेत प्रदर्शित होणार नसून इतर भाषांमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे, खऱ्या अर्थाने मराठीत सुद्धा पॅन इंडिया लेव्हलचे चित्रपट बनत आहे याचा आनंद आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, संजय दत्त, जिनिलिया देशमुख आणि अन्य कलाकार दिसणार आहे.
सलमान खानच्या चाहत्यांमध्ये सध्या त्यांच्या आगामी हिंदी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ ची उत्सुकता आहे. मात्र, याच वेळी मराठी प्रेक्षकांसाठीही एक मोठी आनंदवार्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित करत असलेल्या ऐतिहासिक भव्य चित्रपट ‘राजा शिवाजी’ मध्ये सलमान खान झळकणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात सलमान खान छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय विश्वासू, शूर आणि निष्ठावान सहकारी ‘जीवा महाला’ यांची भूमिका साकारणार अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात सलमानसोबत संजय दत्तही झळकणार असून ते अफजलखानची भूमिका साकारणार आहेत.
वृत्तानुसार, सलमान खान या शुक्रवारी म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी ‘राजा शिवाजी’ मधील त्याच्या भूमिकेचे चित्रीकरण सुरू करणार आहे. हा सीक्वेन्स चित्रपटातील सर्वात भव्य दृश्य अनुभवांपैकी एक असणार आहे. शिवाय, ही भूमिका कथेसाठी महत्त्वाची आणि निर्णायक ठरेल.