सध्या देशभरात निवडणकीचे वारे (Loksabha Election 2024) वाहू लागले आहेत. देशभरात राजकीय नेते आणि त्यांच्या पक्षाची चर्चा सुरू आहे. मनोरजंन सृष्टीतील अनेक कलाकारही या राजकीय दुनियेत स्थिरावले आहेत. यामध्ये अभिनेत्री हेमा मालिनी, जया बच्चन, शत्रुघ्न सिन्हा यांचा नावाचा समावेश आवर्जून होतो. 60-70 च्या दशकात रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनय, विनम्रतनेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते देवानंद (Dev Anand) यांचे आजही तितकेच फॅन आहेत. आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जाणाऱ्या देवानंद यांनीही एक राजकीय पक्षही काढला होता. आदर्श समाज निर्माण करण्यासाठी जाहीरनामाही प्रसिद्ध केला, पण पक्षाला निवडणूक लढवता आली नाही. यांच नेमकं कारण माहित आहे का?
[read_also content=”‘उलझ’चा टीझर रिलीज, फॉरेस्ट ऑफिसरच्या दमदार भुमिकेत दिसणार जान्हवी कपूर! देव आनंद “]
अभिनेते देवानंद जितक्या उत्साहाने सिनेसृष्टीत सक्रीय होते तितक्याच उत्साहात त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली होती. 1979 ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा पक्ष स्थापन केला होता आणि पक्षाचे अध्यक्ष म्हणून देवानंद यांची निवड झाली होती. यावेळी संजीव कुमार यांच्यासह सद्यस्थितीत राजकीयदृष्ट्या सक्रीय असलेले शत्रुघ्न सिन्हा आणि हेमा मालिनी हे देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक भव्य जाहीर सभा घेतली. पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध झाला. मात्र पक्ष पुढे जाऊ शकला नाही.
देवानंद यांच्या जाहीर सभेला जमलेल्या गर्दीची धमक दिल्लीपर्यंत पोहोचली. जाहीर सभेची ताकद पाहून इंदिरा गांधींनीही त्यांना एकत्र काम करण्याचा संदेश दिला होता, असे सांगितले जाते. पण स्वत:च्या मार्गावर चाललेल्या देव आनंद यांनी त्यांचा प्रस्ताव कठोरपणे नाकारला. त्या वेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ‘निरंधर नेत्याशी हातमिळवणी करण्याचा प्रश्नच येत नाही.
तर, पक्षाच्या पहिल्याच सभेला मिळालेला लोकांचा प्रतिसाद बघून काँग्रेस आणि जनता दल या दोन्हींनी पक्षांना धक्का बसला होता. त्यामुळेच या दोन्हीही पक्षांकडून चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांना स्वतःला राजकारणापासून दूर ठेवण्याविषयी सांगण्यात आलं होतं. परिणाम असा झाला की १९८० साली जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच नव्हते.
कुठलेही आघाडीचे कलाकार पक्षाशी जोडले जायला तयार नसल्याने शेवटी जे लोक आधीच पक्षात होते, त्यांनी सुद्धा पक्ष सोडायला सुरुवात केली आणि नाईलाजाने देवानंद यांना आपला पक्ष विसर्जित करावा लागला.