"हे TRP वाढवण्याचं साधन नाही..."; पहलगाम हल्ल्यावरून अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रसारमाध्यमांवर संतापली
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हृदय पिळवटून टाकणारे फोटो आणि व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. सर्वच स्तरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. बॉलिवूडसह मराठी कलाकारही या हल्ल्याचा निषेध करताना दिसत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत संपर्क साधून तिथे नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या माध्यम करताना दिसत आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात आहेत, यावर अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने नाराजी व्यक्त केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत मीडियाला फटकारलं आहे.
शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शिवानी सुर्वे हिने लिहिलेय की, “लोकांनी, विशेषतः मीडियाने, थोडा विचार करावा. सतत पीडितांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मुलाखती घेणं, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारणं, एका मागोमाग एक सोलो इंटरव्ह्यू पोस्ट करणं हे थांबवलं पाहिजे. हा काही टीव्ही शो नाहीये. हे एखाद्या चॅनेलचं टीआरपी वाढवण्याचं साधन नाही. मीडियाने थोडं शहाणपण वापरावे. ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे, त्यांना शांतपणे श्वास घेऊ द्या. त्यांच्या आयुष्यात जे घडलंय ते फार वेदनादायक आहे. आपण त्यांच्या दुःखाचा सन्मान केला पाहिजे, त्यांना त्रास देणं बंद केलं पाहिजे.” अशा शब्दात शिवानीने माध्यमांची चांगलीच कानउघडणी केली आहे. अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
“वाट बघतोय रिक्षावाला…” ऑटोसमोर अंकिता लोखंडेने दिल्या दिलखेचक अदा
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातून हल्ल्याचा निषेध म्हणून कँडल मार्च आणि शांतता रॅली काढताना दिसत आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांवर निशाणा साधण्यात आला. २२ एप्रिलला झालेल्या ह्या हल्ल्यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ने घेतली होती. त्या मृत पावलेल्या २६ पर्यटकांमध्ये, दोन विदेशी, दोन स्थानिक आणि २२ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे.