अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही आपली एक ओळख निर्माण केली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस (Nick Jonas) हे दोघे वर्षभरापूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे याविषयीची माहिती दिली होती. त्यानंतर प्रियांका चोप्रा-निक जोनसची मुलगी मालती मेरीची एक झलक पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. अशातच प्रियांकाच्या लेकीचा चेहरा दिसत असलेला पहिला व्हिडिओ (Priyanka Chopra Daughter Video) समोर आला आहे.
प्रियांका चोप्राने नुकतंच एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी जोनस ब्रदर्स, निक जोनस हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी प्रियांका ही मालतीला हातात घेऊन पहिल्या रांगेत बसलेली होती. याचा एक व्हिडीओ प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत निक स्टेजवर बोलत असल्याचे दिसत आहे. निक हा मालतीकडे हात दाखवत असल्याचेही पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये मालतीचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये जोधपुर येथे निक जोनससह लग्न केलं होतं. त्याच्या रॉयल वेडिंगची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये प्रियांकाने सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला.
प्रियांका आगामी काळात ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ या चित्रपटामधून आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिकेत आहे. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होऊ शकतो. रिपोर्टनुसार, हा चित्रपट कॅरोलिन हरफर्थच्या 2016 च्या जर्मन चित्रपट ‘SMS फर डिच’ वर आधारित आहे. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये देखील प्रियांका प्रमुख भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे.