(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
ग्लोब ट्रॉटर इव्हेंटच्या प्रचंड यशाने खरोखरच चर्चा रंगवली आहे. या इव्हेंटमध्ये एस. एस. राजामौली यांच्या पुढील मेगा फिल्म वाराणसीचा दमदार टीझर आणि टायटल प्रदर्शित करण्यात आला, ज्यात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहेत. हे आतापर्यंतच्या भारतातील सर्वात मोठ्या घोषणांपैकी एक ठरले असून, याने आधीची सर्व उत्सुकता मागे टाकली आहे. या इव्हेंटला मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते, तसेच महेश बाबू, प्रियंका चोप्रा जोनस आणि पृथ्वीराज सुकुमारन यांसारखे मोठे कलाकारही उपस्थित होते.
चित्रपटाबद्दल सर्वजण उत्साहित आहेत; मात्र प्रियंका विशेष आनंदी आहे कारण तिला तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या सोबत, तेही एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटात, काम करण्याची संधी मिळत आहे.
प्रियंकाने आपल्या सोशल मीडियावर महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबतच्या फोटोंसह असे लिहिले आहे ,”तेलुगू आणि मल्याळम इंडस्ट्रीतील या दोन दिग्गजांसोबत काम करणे, तेही एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटात, हे स्वतःमध्येच एक मोठे भाग्य आहे.त्यावरही आम्ही आमचा चित्रपट आंतरराष्ट्रीय मीडियासोबत प्रमोट करत आहोत, तेही रिलीजच्या जवळपास एक वर्ष आधी!त्यांच्या प्रतिक्रिया पाहणे आणि वाढती उत्सुकता जाणवणे, खरे सांगायचे तर खूप रोमांचक आहे.देवाच्या कृपेने, आम्ही तुमच्या अपेक्षांवर नक्कीच खरे उतरू.जय श्री राम.#Varanasi” असे लिहित तिने त्यांना टॅग केले आहे.
15 नोव्हेंबरला रामोजी फिल्म सिटीमध्ये आयोजित ग्लोब ट्रॉटर या भव्य इव्हेंटमध्ये 50,000 हून अधिक चाहत्यांची उपस्थिती होती. भारतीय मनोरंजन क्षेत्रातील ही सर्वात मोठ्या लाइव्ह फॅन गॅदरिंगपैकी एक ठरली. हे दृश्य खरोखरच अभूतपूर्व होते, जे विशेषतः एका चित्रपटाच्या घोषणेसाठी तयार करण्यात आले होते.
याशिवाय, पृथ्वीराज सुकुमारन यांचा ‘कुंभ’ या भूमिकेतील जबरदस्त पहिला लूक आणि प्रियंका चोप्रा जोनस यांचा ‘मंदाकिनी’ या रूपातील प्रभावी अंदाज आधीच प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली असून देशभरात उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता उत्साह शिगेला पोहोचला असून प्रेक्षक या भव्य आणि शानदार सिनेमॅटिक अनुभवाची आतुरतेने वाट पाहत आहेत, जो संक्रांत 2027 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.






