Saleel Kulkarni: "नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन..."; गायक सलील कुलकर्णींचे ट्रोलर्सना कवीतेतून सणसणीत उत्तर
कलाकार म्हटलं की, त्यांना कौतुकाप्रमाणेच ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. प्रत्येक कलाकार हा यशाच्या शिखरावर जात असताना त्याला ह्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. कौतुक आणि ट्रोलिंग करण्याचं उत्तम माध्यम म्हणजे, सोशल मीडिया… सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना हे फेक युजर्स कोणत्या ना कोणत्या कारणावरुन ट्रोल करतच असतात. काही सेलिब्रिटी आणि गायक त्या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर तर देतातच, पण काही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आता अशातच या प्रकरणावर गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ट्रोलर्ससाठी खास एक कविता लिहिली आहे, जी त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
कवितेच्या माध्यमातून गायकाने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर भाष्य केलं आहे. सलील कुलकर्णीनी ट्रोलर्सवर आधारित “नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो” हे शीर्षक असलेली कविता सादर केली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेक मराठी कलाकारांनी या कवितेला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
अपूर्वा नेमळेकरची वडिलांसाठी भावूक पोस्ट; म्हणाली, “तुम्ही कुठून तरी ऐकू शकाल, पण…”
नवीन डेटा पॅक दे रे
आभाळावर थुंकीन म्हणतो
रोज वेगळं नाव लावून
लपून लपून भुंकीन म्हणतो …
नवीन डेटापॅक दे रे
आभाळावर थुंकीन म्हणतो ..
– सलील कुलकर्णी
एक निरीक्षण… अशा निनावी , आणि चेहरे नसलेल्या माणसांचं..
कुठून येतात ही माणसं ? कुठून येते ही वृत्ती ?
कोणाविषयीच आदर न वाटणारी .. ते एखादंच वाईट वाक्य बोलतात .. पण जो ऐकत असतो ,त्याने ऐकलेलं त्या दिवसातले १०० वे वाईट वाक्य असेल आणि त्याचा तोल ढळला तर ? तो जगण्यावर रुसला तर ? अशी भीती सुद्धा वाटत नाही ह्यांना ?
या वृत्तीच्या माणसांच्या मनातल्या अंधारात डोकावून पाहायचा प्रयत्न करतांना ही कविता सुचली, असं कॅप्शन देत सलील कुलकर्णींनी ही कविता शेअर केली आहे.
सलील कुलकर्णीची कविता
“नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो,
रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुकीन म्हणतो…
याच्यासाठी काही म्हणजे काही लागत नाही,
कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही
कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको,
आपण नक्की कोण, कुठले, याचे सुद्धा भान नको
खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी,
दिशाहीन त्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा
चालव बोटे धारदार, शब्दांमधून डंख मार,
घेरून घेरून एखाद्याला वेडा करून टाकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो…
खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव,
ज्याला वाटेल, जसं वाटेल, धरून धरून खुशाल बडव
आपल्यासारखे आहेत खूप, खोटी नावे, फसवे रूप,
जेव्हा कोणी दुबळे दिसेल, अडचणीत कोणी असेल,
धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे,
जोपर्यंत तुटत नाही, धीर त्याचा सुटत नाही,
सगळे मिळून टोचत राहू, त्याच्या डोळ्यात बोचत राहू,
धाय मोकलून रडेल तो, चक्कर येऊन पडेल तो,
तेवढ्यात दुसरे कोणी दिसेल ज्याच्या सोबत कोणी नसेल,
आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ,
मग घेऊ नवीन नाव, नवा फोटो, नवीन डाव,
त्याच शिव्या, तेच शाप, त्याच शिड्या, तेच साप,
वय, मान, आदर, श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो,
जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो…
थोडा डेटा, खूप मजा, छंद किती स्वस्त आहे,
एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे
नवा डेटा पॅक दे ना आभाळावर थुंकीन म्हणतो…
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो…”
बॉबी देओलने खरेदी केली अलिशान Range Rover SUV, किंमत ऐकून चक्रावून जाल