लाल रंग हा आपल्या वैयक्तिक ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत असा मानवी आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा रंग आहे.
सगळ्यात जास्त आकर्षक मानला गेलेला असा हा रंग आहे. सर्वसामान्यांच्या कपड्यांपासून ते इंग्लंडच्या महाराणीच्या मुकुटापर्यंत सगळीकडे याला स्थान आहे. पाश्चिमात्य देशात लाल हा राजघराण्याचा रंग मानला जातो.
भारतात व बऱ्याचशा पूर्व आशियाई देशात लाल रंगाला खूप महत्त्व आहे. आपल्याकडे हा एक शुभ रंग म्हणून ओळखला जातो. लग्नकार्यात वधूची साडी, कपाळावरचे कुंकू, शेला, तोरणे यात लाल रंग आवर्जून वापरतात. चीनमध्ये सुद्धा या रंगाला खूप महत्त्व आहे. त्यांच्या प्रत्येक सणात व लग्नात लाल रंगाचा पुरेपूर वापर केलेला आढळतो.
सगळ्यात जास्त आणि लवकर लक्ष वेधून घेणारा हा रंग आहे. म्हणूनच धोका दर्शवण्यासाठी जगभरात हा प्रमाणित रंग आहे. सिग्नल वर असलेला लाल रंगाचा थांबा!
लाल आणि या रंगाच्या इतर छटा मुलींच्या आवडत्या रंगांपैकी एक. जे लाल रंगाची निवड करतात ते अधिक आशादायी आणि कार्यक्षम असतात असं रंगाचं मानसशास्त्र सांगतं. वॉर्म कलर्स म्हणजे उष्ण रंगप्रकारामध्ये हा रंग येतो. उत्साह, क्रिया, इच्छाशक्ती याचा हा रंग प्रतीक आहे.
लाल रंग चटकन नजरेत भरणारा असतो. शक्ती, युद्ध आणि धोका या गोष्टींना सूचित करणाऱ्या या रंगाचा एखाद्या व्यक्तीच्या भावनांवर खोलवर परिणाम होतो. शिवाय, पचनक्रिया, श्वसन सुधारते.
हा रंग इतका भडक असतो की, लाल रंग छटेच्या कपडय़ांमुळे एखाद्याचं लक्ष तुमच्याकडे पटकन खेचलं जातं. त्यामुळे लोकांच्या नजरा तुमच्यावर अधिक असाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर अशा रंग संगतीला पसंती दिली जाते.
सर्वात आक्रमक, अतिशय धडाडीचा, सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा व प्रचंड ताकदीच्या या रंगाचे वर्णन करायचे तर ‘मी, माझे’ या भोवतीच घुटमळणारा रंग असे करता येईल. या रंगाच्या प्रभावाखाली बाकीचे रंग अगदीच नगण्य होऊन जातात. कितीही गर्दी असू देत हा रंग प्रथम लक्ष वेधून घेतो. स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये या रंगाचा एक तरी कपडा असणे अत्यंत गरजेचे आहे. याचा उपयोग कोणावर प्रभाव पाडायला कामी येतो. खास करून एखाद्या मिटिंगमध्ये स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा कोणासमोर भाषण देताना. हा रंग सर्वाचे लक्ष तुमच्यावर केंद्रित करायला मदत करतो. अर्थात याचा संयमित व कल्पकतेने वापर करणे फार गरजेचे आहे. नाहीतर या रंगाच्या अतीवापराने तुमची गर्विष्ठ, आत्मकेंद्री अशी प्रतिमा होऊ शकते.
पिवळा रंग मेंदूशी जोडला गेला आहे तसा लाल रंग शारीरिक ऊर्जेशी जोडला गेला आहे. हा रंग भरपूर ताकद, मस्ती आणि स्फूर्ती घेऊन येतो. या रंगाच्या आक्रमक गुणधर्माचा प्रभाव खेळाडूंवर पण पडतो. असे म्हणतात की, ‘विनर्स वेअर रेड’ बॉक्सिंग, कुस्ती वगैरे खेळात लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्पर्धकाला मानसिक व शारीरिक फायदा होतो. तसेच प्रतिस्पर्धी थोडा दबला जातो हे सिद्ध झाले आहे. मैदानी खेळातही लाल युनिफॉर्मच्या संघाचा चाहता वर्ग जास्त असतो. हे असे का होते तर, लाल रंगामुळे स्वत:ची शारीरिक ऊर्जा वाढते, पण तेच समोरच्याची कार्यक्षमता व विचार करण्याची कुवत मात्र घटते.
झणझणीत रस्सा, तंदुरी कबाब, मिसळ, बटर चिकन चवीबरोबर डोळ्यासमोर उभे राहतात. वेगवेगळ्या डिशेसमध्ये सजवलेले हे लालेलाल पदार्थ. या पदार्थाच्या चवी व वासाबरोबरच आकृष्ट करतो तो त्याचा रंग! लाल रंग भूक वाढवतो. त्यामुळे कुठल्याही खाण्याच्या जागी लाल रंगाच्या विविध छटा वापरलेल्या दिसतात.
वास्तूमध्ये लाल रंगाचा वापर जरा धोकादायक ठरू शकतो. खासकरून जर या रंगाची माहिती नसेल तर. त्यापेक्षा लाल रंगाच्या छटा वापरणे जास्त सोपे आहे. या छटा पांढरा किंवा काळा रंग मिसळून गुलाबीपासून मरूनपर्यंत विविध रंगांच्या बनू शकतात. या छटा लाल रंगासारख्या आक्रमक नसल्याने लोकांना जास्त भावतात. भडक लाल रंगात थोडा थोडा पांढरा रंग मिसळून गुलाबी रंगाच्या कितीतरी आल्हाददायक छटा बनवता येतात. हा सौम्य-शांत रंग बाळांच्या कपडय़ांच्या दुकानांपासून बायकांच्या सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांपर्यंत कुठेही अतिशय सुंदर दिसतो. तसेच मरून रंग खानदानी, अभिरुचीसंपन्न दिसतो. ज्यांना लाल रंग त्याच्या मूळ स्वरूपात वापरायचे धाडस नसेल अशांसाठी मरून रंग हा एक चांगला पर्याय आहे. याचा वापर दिवाणखाना, जेवायची जागा, स्वयंपाकघरात अतिशय चांगला दिसतो.
लाल रंगाचे डोळ्याला भासणारे वजन खूप जास्त असते. त्यामुळे सजावटीत संतुलन साधण्यासाठी या रंगाचा संयत वापर करणे फार गरजेचे आहे.
वेगाचा, आक्रमकतेचा तसेच स्त्री-पुरुषातील आकर्षणाचा रंग आहे. तुमच्या-माझ्यात, प्रत्येक स्त्री-पुरुषात, सर्व जाती-धर्मात एकच असलेला हा रंग…आपल्या रक्ताचा रंग….
बायबलमध्ये “लाल” हा शब्द ज्या इब्री शब्दातून घेतला आहे त्याचा मूळ अर्थ “रक्त” असा होतो.
स्त्रियांच्या आयुष्यात तर याचे विशेष महत्व आहे. दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात जो सृजनाचा उत्सव साजरा होतो, त्या शरीरधर्माचा, स्त्रीत्वाचा हा रंग… म्हणजेच तुमचे-माझे आस्तित्व ज्यामुळे त्याचा हा रंग…
एखाद्या कळीचा जन्माला येण्याचा अधिकार जेव्हा नाकारला जातो, त्याचा हा लाल रंग… म्हणून मला हा स्वतःच्या रोजच्या मूलभूत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या, कष्टकऱ्यांचा, हातावर पोट असलेल्यांचा रंग वाटतो… या रोजच्या असुरक्षिततेमधूनच कदाचित त्यांच्यात आक्रमकता येत असावी का?
अजून एका स्त्री घटकाशी हा रंग जोडलेला आहे तो म्हणजे “रेड लाईट एरिया”… तिथल्या स्त्रियांच्या आयुष्यात तर क्षणोक्षणी धोका आहे. त्यांना ही आणि इतरांना ही. त्यांच्या आयुष्याच द्योतक वाटतो हा रंग…
तुमच्या माझ्या आणि यांच्याही धमन्यातून वाहणारे रक्त एकाचं रंगाचे… या स्त्रिया पण आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत ही जाणीव ठेवूयात…
आज या आदिशक्तीचा जागर करताना तीच शक्ती या स्त्रियांमध्ये पण नांदत आहे याची आठवण करून त्यांच्या आस्तित्वाचाही आज जागर करुया आणि त्यांच्या कष्टांना माणूसकीचा नैवेद्य दाखवूया….
रश्मी पांढरे
(लेखिका ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)