tarapur midc

तारापूर औद्योगित वसाहत १९७४ साली स्थापन झाली. आज ४६ वर्षे झाल्यावरही ही एमआयडीसी (basic facilities not available in Tarapur MIDC) मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे.

  संतोष चुरी, पालघर: आशिया(asia) खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी(largest midc in asia) म्हणून तारापूर एमआयडीसीचा उल्लेख होत असे. ही औद्योगित वसाहत १९७४ साली स्थापन झाली. आज ४६ वर्षे झाल्यावरही आरोग्य यंत्रणा, डम्पिंग ग्राउंड, सांडपाणी प्रक्रिया केंद्र साफसफाई, दिवाबत्ती, या(basic facilities not available in Tarapur MIDC) मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे.

  तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये आजघडीला ११३६ कारखाने सुरू आहेत. सध्या केंद्र व राज्य सरकार ‘मेक इन इंडिया’ व ‘ मेक इन महाराष्ट्र’  या उपक्रमांतर्गत बाहेरील देशांना व राज्यांना नवीन उद्योग उभारणीसाठी सरकारने पायघड्या घालत आहे. मात्र महाराष्ट्रात जे लहान, मोठी औद्योगिक शहरे आहेत त्यांच्या मूलभूत गरजा सरकार व शासकीय यंत्रणा पूर्ण करत नाही ,अशी खंत उद्योजक व्यक्त करीत आहेत.

  केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कायदे जुने व जटील, जाचक असल्याची भावना उद्योजकांमध्ये आहे. त्यांची भाषा सोपी, सरळ असावी अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. तारापूर एमआयडीसी सर्वात प्रदूषित शहर म्हणून बदनाम झाली आहे. औद्योगिक वसाहतीच्या विभागातील सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याने प्रदूषण मंडळाने कारखाने बंद करण्याचा सपाटा लावला आहे तर हरितलवादामार्फत येथील १०३ कंपन्यांना १६० कोटी चा दंड ठोठावण्यात आला आहे.

  औद्योगिक विभागात लहान – मोठे अपघात होत असतात. यामध्ये २२ मार्च २०१३ साली आरती ड्रग कंपनीत झालेल्या स्पोटात सात जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सिक्वेंट केमिकल कंपनीत झालेल्या अपघातात ४ जण मरण पावले होते या घटनांनी संपूर्ण तारापूरी हादरली होती.१९९८ ते २०२०च्या दरम्यान अंदाजे ३५ जणांचा मृत्यू झाला.  शेकडो कामगारांना कायमचे अपंगत्व आल्याचे समजते आहे.सततच्या घडणाऱ्या अपघातानंतर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ जागृत होऊन काही उपाय करेल असे वाटत होते, पण तसे काही होत नसल्याचे दिसत आहे.

  तारापूर औद्योगिक विभागालागत पास्थळ, कोलवडे, कुंभवली, सरावली, खैरे पाडा आणि बोईसर या ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगारमुळे निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. निवासी भाग असून औद्योगिक व निवासी भागात बफर झोन असणे आवश्यक असताना तसे नियोजन करण्यात आले नाही. त्याचा परिणाम निवासी भागासह बोईसरकरांना सहन करावा लागत आहे.

  उद्योगांमध्ये नागरी वस्ती खेटून उभी आहे. रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण होते. तिथे नागरिक राहतात कसे हा प्रश्न कोणालाही पडत नाही इतकी भयानक परिस्थिती या भागात आहे. आता नागरिकांना विस्थापित करता येत नाही म्हणून उद्योजकांना विस्थापित करण्याची मागणी अधूनमधून करण्यात येत आहे. यामुळे कामगार मात्र देशोधडीला लागणार आहे. प्रत्यक्षरीत्या दोन लाख कामगार या ठिकाणी काम करीत असून या औद्योगिक वस्तीमुळे परिसरातील सुमारे ५ ते ६ लाख कामगारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.असे असताना मात्र आजही तेथे उद्योगधंद्यांच्या दृष्टीने सुविधांचा अभावच दिसून येत आहे.