बंदुकीसह स्टोरीला ठेवला फोटो; पोलिसांनी चौकशी करताच धक्कादायक माहिती समोर
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे एका व्हायरल फोटोमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा अखेर पोलिसांनी सखोल तपास करून मोठा उलगडा केला आहे. हातात ऐके-४७रायफल आणि कंबरेला पिस्तूल असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
साधा फळ विक्रेता असलेल्या तरुणाकडे एवढी घातक शस्त्रे कशी आली, याबाबत नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दि. २८ मार्च २०२६ रोजी तोफिक बिलाल बागवान (वय २६, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) याच्या इंस्टाग्राम आयडीवर हा फोटो प्रसारित झाला होता. हा फोटो समोर येताच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ तपास सुरू केला.
Ahilyanagar News: दुर्दैवी! वीज पडून शेतकऱ्यासह 9 गायींचा मृत्यू; अवकाळीचा मोठा फटका
पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कमलाकर चौधरी, सपोनि धर्मसिंग सुंडे, एम.बी. दहीफळे, एस. डी. बोडे, तांबरे, जे. डी. गावरे, आर. जी. खरातोडे, आर. डी. शेख, एन. डी. जाधव तसेच श्रीरामपूर येथील पोलीस कर्मचारी सचिन धनवट यांच्या पथकाने आणि एटीएसच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत संबंधित तरुण व त्याचा मित्र इस्माईल रज्जाक शहा (वय ३९) यांना तात्काळ ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक ठरली. हा फोटो प्रत्यक्षात खरा नसून द्राक्षांच्या बागेत काढलेल्या मूळ फोटोवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने एडिट करून तयार करण्यात आला होता.
“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha यांचे विधान
इस्माईल रज्जाक शहा याने मोबाईलवरून हा फोटो तयार करून तोफिक बागवानच्या हातात रायफल आणि कंबरेला पिस्तूल दाखवले आणि नंतर तो फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला. या प्रकारामुळे परिसरात निर्माण झालेली भीती लक्षात घेता पोलिसांनी तपास अधिक वेगाने केला. आगामी सण-उत्सवांच्या पाश्र्श्वभूमीवर समाजात तणाव निर्माण होऊ शकतो, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे माहिती असूनही हा फोटो व्हायरल करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणातून एक गंभीर वास्तव समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेने दाखवून दिले आहे. एआय सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कोणतीही खोटी प्रतिमा तयार करून समाजात भीती आणि गोंधळ निर्माण केला जाऊ शकतो.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, कोणतीही माहिती पडताळणीशिवाय पुढे पाठवू नये, अफवा पसरवू नयेत आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा. अन्यथा अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोळपेवाडीतील या घटनेने संपूर्ण तालुक्याला एक मोठा धडा दिला असून, डिजिटल युगात सजग आणि सतर्क राहण्याची गरज अधोरेखित केली आहे.






