मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा ‘बलोच’ (Baloch) या चित्रपटाविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. या चित्रपटातील पहिलं प्रेमगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. ‘खुळ्या जीवाला आस खुळी’ (Khulya Jivala Song) असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिने स्वरबद्ध केले आहे. मनातील भावना अभिव्यक्त करणाऱ्या या सुमधुर गाण्याला गुरु ठाकूर यांचे शब्द लाभले असून नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या‘बलोच’च्या पोस्टर, टीझरमध्ये प्रवीण तरडे एका लढवय्याच्या रूपात दिसत आहेत. तर या गाण्यात त्यांची एक वेगळीच बाजू पाहायला मिळत आहे. तर स्मिता गोंदकरही या गाण्यातून पहिल्यांदाच अशा अंदाजात दिसत आहे. प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि स्मिता गोंदकर (Smita Gondkar) यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या प्रेमगीतात नजरेतून प्रेमाच्या तरल भावना व्यक्त होत असून मिश्र भावनांचं सुरेख गुंफण दिसत आहे. नवरा -बायकोमधील विलक्षण प्रेम मनाला भावणारे आहे. एकाच वेळी आपल्या योद्धा नवऱ्याला खंबीर पाठिंबा देत असतानाच स्वारीवर जाण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या नवऱ्याला निरोप देताना अस्वथ झालेली पत्नीही पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत, प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शित या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे, स्मिता गोंदकर यांच्यासह अशोक समर्थ यांचीही प्रमुख भूमिका आहे. 5 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.