Sky Dome आणि भूमिगत बंकर : मुस्लिम देशांमध्ये तुर्की कसा बनला सर्वात सुरक्षित देश? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Turkey safety infrastructure : तुर्की हा देश सध्या जगभरात फक्त राजकारण किंवा परराष्ट्र धोरणामुळेच नाही, तर आपल्या अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्थेमुळेही चर्चेत आला आहे. राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सैन्याला एक असे हत्यार दिले आहे, जे भविष्यात तुर्कीच्या सुरक्षेचे सर्वात मोठे कवच ठरणार आहे याचे नाव आहे स्काय डोम सिस्टम (Sky Dome System).
४७ वाहनांनी बनलेली ही अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली तब्बल ४६० दशलक्ष डॉलर्स किमतीची आहे. त्याचबरोबर, तुर्की सरकारने देशातील ८१ प्रांतांमध्ये भूमिगत बंकर उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे मुस्लिम जगतात तुर्की आज “सर्वात सुरक्षित देश” म्हणून उदयास येत आहे.
अंकारा येथे संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असेलसन (ASELSAN) च्या नवीन कॅम्पसच्या पायाभरणी समारंभात एर्दोगान यांनी आपल्या लष्कराला ही स्काय डोम प्रणाली सुपूर्द केली. यावेळी त्यांनी एक प्रभावी विधान केले—
“जो देश स्वतःची हवाई संरक्षण प्रणाली तयार करत नाही, तो भविष्यात आत्मविश्वासाने उभा राहू शकत नाही.”
हे वाक्य फक्त सैनिकी धोरणापुरते मर्यादित नाही, तर ते तुर्कीच्या दीर्घकालीन सुरक्षा धोरणाचा केंद्रबिंदू आहे. कारण शेजारील सीरिया, ग्रीस, इराक किंवा इस्रायलसारख्या प्रदेशातील अस्थिरता तुर्कीला नेहमीच धोका निर्माण करत असते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Russia: अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियावर निर्बंध तरीही ट्रम्प यांचा हिऱ्यांच्या कराराला ग्रीन सिग्नल, जाणून घ्या कारण
एर्दोगान यांच्या मते, स्टील डोम प्रणाली आणि स्काय डोम यामुळे तुर्की आता हवाई संरक्षण क्षेत्रात एका “नव्या संघात” दाखल झाला आहे. या प्रणालीमध्ये ३ HISAR मध्यम श्रेणी हवाई संरक्षण युनिट्स आणि २१ विशेष वाहने जोडली जात आहेत. यामुळे तुर्कीची आकाशातील सुरक्षा क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. अमेरिकेच्या Iron Dome प्रणालीशी तुलना केली जाणारी ही तंत्रज्ञान प्रणाली, येणाऱ्या क्षेपणास्त्र, ड्रोन आणि शत्रूंच्या हवाई हल्ल्यांना काही क्षणांत निष्प्रभ करण्याची ताकद ठेवते. यामुळे तुर्कीची राजधानी अंकारा पासून इस्तंबूलपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या शहरावर एक संरक्षक कवच तैनात झाले आहे.
Beneath the streets of Derinkuyu, Turkey lies an ancient underground city stretching 18 stories deep, capable of sheltering 20,000-30,000 people. Carved from volcanic rock thousands of years ago, it features ventilation shafts, stables, kitchens, and even schools — all hidden… pic.twitter.com/RqtcgGBv5z
— Billy Carson II (@4biddnKnowledge) August 9, 2025
credit : social media
याचसोबत तुर्की सरकार ८१ प्रांतांमध्ये भूमिगत बंकर उभारण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. चॅनेल NTV च्या वृत्तानुसार, हे बंकर भविष्यातील मोठ्या युद्धाच्या संकटाला तोंड देण्यासाठी एक “सुरक्षा कवच” असतील. युद्धकाळात सामान्य नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठेवण्यासाठी अशा बंकरचे महत्त्व अतुलनीय ठरते. हे पाऊल तुर्कीला केवळ लष्करीदृष्ट्या नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय स्थैर्य मिळवून देणारे आहे. कारण नागरिकांचा आत्मविश्वास हा कोणत्याही देशाच्या लष्करी ताकदीइतकाच महत्त्वाचा मानला जातो.
तुर्की केवळ आपल्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर आपल्या मित्र राष्ट्रांसाठीही अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान निर्माण करत आहे. एर्दोगान यांच्या मते, आज तुर्कीने संरक्षण उत्पादनात तब्बल ८३% स्थानिकीकरण (Indigenization) साध्य केले आहे. सध्या तुर्कीचे लष्करी तंत्रज्ञान १८५ देशांमध्ये वापरले जात आहे. त्याची वार्षिक संरक्षण निर्यात तब्बल ७.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच, तुर्की केवळ सुरक्षा क्षेत्रातच नव्हे तर आर्थिक आणि राजनैतिक पातळीवरही मोठी झेप घेत आहे.
आज अरब जगतात सौदी अरेबिया, इराण, कतार यांसारख्या देशांची सत्ता असली, तरी सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुर्की वेगळा ठसा उमटवत आहे. सीरिया, पॅलेस्टाईन, अझरबैजान, पाकिस्तान अशा अनेक वादांमध्ये तुर्कीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. स्काय डोम, स्टील डोम आणि भूमिगत बंकर यांच्या साहाय्याने तुर्की मुस्लिम जगात “सर्वात सुरक्षित राष्ट्र” म्हणून उभे राहिले आहे. एर्दोगान यांची ही रणनीती केवळ सैनिकी सामर्थ्यापुरती मर्यादित नाही; ती राजकीय प्रभाव, राजनैतिक ताकद आणि लोकांच्या आत्मविश्वासालाही बळकटी देते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : किल ट्रम्प – Nuke India…मिनियापोलिस हल्ल्याचे थरारक सत्य; हल्लेखोराच्या विकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL
जग एका नव्या शीतयुद्धाकडे वाटचाल करत असताना, तुर्कीने घेतलेली ही पावले इतर मुस्लिम देशांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण आहे. सुरक्षा, तंत्रज्ञान आणि स्वावलंबन या तिन्ही अंगांनी तुर्कीने आज स्वतःला एका नव्या उंचीवर पोहोचवले आहे. त्यामुळेच आकाशात घुमणारा स्काय डोम आणि जमिनीत बांधलेले बंकर हे तुर्कीला मुस्लिम जगातील अभेद्य किल्ला बनवत आहेत.