ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावरुन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा खासदार राऊतांनी समाचार घेतला (फोटो - सोशल मीडिया)
Sanjay Raut On CM Fadnavis : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. दरम्यान, गणेशोत्सावाच्या निमित्ताने राजकीय नेते हे एकमेकांच्या घरी भेट देत आहे. मनसे नेते राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे आले होते. सकाळी ठाकरे बंधूंची भेट झाल्यानंतर रात्री राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस हे देखील आले होते. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावर टोमणा मारला. यावर आता खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. राज-उद्धव यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. दोन्ही बंधूंना एकत्रित राहण्याची सुबुद्धी मिळावी आणि त्यांनी एकत्रच रहावे, असे म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे. यानंतर खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. खासदार राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, त्या शुभेच्छा या क्षणी महत्वाच्य़ा आहेत दोन भाऊ एकत्र आले आहे. हे त्यांना खरोखर मनापासून वाटत आहे आणि मला खात्री आहे काल स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या गणरायाच्या दर्शनाला गेले तिथे हात जोडले त्याच्यामुळे त्यांनी त्या गणरायाकडे तीच इच्छा व्यक्त केली असेल महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रात सध्या जे संकट सुरू आहेत राजकीय ते दूर करण्यासाठी ज्या गणरायांना दोन्ही ठाकरे बंधूंना बळ द्यावं शक्ती द्यावी नक्कीच देवेंद्रजींची हीच भूमिका असावी, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत म्हणाले की, “ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत शेलार आणि फडणवीस नाही, ठाकरे यांचीही परंपरा आहे ती महाराष्ट्रात फार मोठी आहे तसेच आहे का? अजिबात नाही, त्याच्यामुळे ठाकरे हे कायम सुदबुद्धी घेऊन जन्माला आलेले असतात आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवसेना आणि ठाकरे यांचे कार्य सतत सुरू असतं. शेलार आणि फडणवीस हे मुंबईमध्ये जे वावरत आहेत ते ठाकरे यांची कृपा आहे. हे त्यांनी मान्य केले पाहिजे नाहीतर त्यांना कबूतर हाकायला गुजरातमध्ये जाव लागलं असतं. ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात एक पाऊल पुढे जाणार नाही. मराठ्या विना राष्ट्र गाडा न चालेल, यासाठी ठाकरे यांची गरज आहे महाराष्ट्राला,” असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आंदोलनाबाबत खासदार राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे, कारण हे आंदोलन साधन सोपं नाही लाखोच्या संख्येने मराठी माणूस मुंबईत आला असेल तर त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय शांतता राहणार नाही. मुंबईमध्ये गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात आहे पण त्यांनी आंदोलनाची एक तारीख घेतली आहे पण राज्याचे प्रमुख म्हणून बहुमतातलं सरकार तुम्ही चालवत आहात आणि तुम्हाला सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमचे दोन उपमुख्यमंत्री जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्या संदर्भात थेट चर्चा केल्याशिवाय या प्रश्नांना गती मिळेल किंवा वातावरण भविष्यामध्ये बिघडणार आहे ते थांबेल असं माझे मत आहे,” असे खासदार राऊत म्हणाले.