संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील नामांकित हॉटेल ‘पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट’चे मालक संतोष शेट्टी (वय ४५) यांचा त्यांच्याच हॉटेलातील कामगाराने रागाच्या भरात खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना मंगळवारी (दि. २६) रात्री उशिरा घडली आहे. किचनमधला चाकू आणत तो अचानक त्यांच्या पोटात घुपसून व वार करून खून केला आहे. बेसावध असल्याचे पाहून त्याने वार केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गिरी काही दिवसांपासूनच पीकॉक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. पगार व इतर कारणांवरून तो नेहमीच मालकाशी वाद घालत होता. मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून शेट्टी व गिरी यांच्यात वाद झाला. वाद चिघळल्यावर गिरीने संतापाच्या भरात स्वयंपाकघरातील चाकू उचलून आणला. तर बेसावध असलेल्या शेट्टी यांच्या गळ्यावर वार केला. त्यांच्या पोटात चाकू घुपसला. यात गंभीर जखमी झालेल्या शेट्टी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. उत्तमनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला
पुण्यातून एक खळळबळजनक बातमी समोर आली आहे. खराडी परिसरात अंडाभुर्जीच्या गाडीवर किरकोळ वादातुन दोघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोक्यात व तोंडावर वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहन माने (वय २२, रा. मुंढवा झेड कॉर्नर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र रोहित तानाजी चौगुले (वय २६, रा. सणसवाडी चौक सणसवाडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार खराडी पोलिसांनी दोघावर खूनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री पावने बारा ते एक वाजताच्या सुमारास रिलायन्स मार्ट समोर रिलायन्स चौक खराडी येथे घडली आहे.