महिलांच्या कपाटात असंख्य साड्या असल्या तरीसुद्धा महिला सणावाराच्या दिवसांमध्ये सुंदर सुंदर डिझाईन्सच्या, रंगाच्या साड्या खरेदी करतात. सणवार, घरातील कोणतेही कार्यक्रम याशिवाय लग्नकार्यात महिला सुंदर साडी नेसून तयार होतात. बऱ्याचदा साडी खरेदीसाठी गेल्यानंतर नेमकी कोणत्या रंगाची साडी खरेदी करावी? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात असतात. पण तुम्ही कधी साडी काठ पाहून खरेदी केली आहे का? नसेल केली तर नक्की करून पहा. आज आम्ही तुम्हाला साडीच्या काठाचे अनोखे आणि वेगवेगळे प्रकार सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हीसुद्धा साडी विकत घेताना काठ पाहून साडी खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
साडीच्या रंगासोबत काठाचे सुद्धा आहेत अनेक प्रकार! जाणून घ्या साडीच्या काठाचे सुंदर प्रकार
जगभरात प्रसिद्ध असलेली पैठणी साडी सर्वच महिलांना खूप आवडते. पैठणी साडीच्या काठावर सुंदर मोराचे नक्षीकाम केले जाते. या साडीच्या पदरावर सुद्धा मोर असतो. त्यामुळे तुम्ही मोराचा काठ असलेली साडी खरेदी करू शकता.
गोटा पट्टीचा वापर करून तयार केलेली साडी प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानमध्ये पाहायला मिळते.साध्या काठाला सुंदर गोटा पट्टी लावून साडी आणखीनच उठावदार बनवली जाते.
सोनेरी जरीचा वापर करून बनवलेली साडी अतिशय रिच आणि स्टायलिश लुक देते. सोन्याच्या जरीचा वापर करून विणलेला साडीचा काठ सगळ्यांचं आवडतो. सणावाराच्या दिवसांमध्ये तुम्ही जरीचा काठ असलेली साडी नेसू शकता.
कांजीवरम सिल्क साडी अंगावर अतिशय चापून चोपून बसते. या साडीचा काठ मोठा असतो. दक्षिण भारतात तयार करण्यात आलेली साडी जगभरात प्रसिद्ध आहे. या साडीच्या काठावर देऊळ किंवा मंदिर यांचे नक्षीकाम केले जाते.
वेलवेटच्या कापडाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या साडीचा काठ अतिशय साधा असतो. ही साडी आणखीन उठावदार आणि सुंदर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी लेस किंवा नक्षीकाम तुम्ही करून घेऊ शकता.