भाईंदर/विजय काते : भाईंदरमधील राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपाचे वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नगरसेवक संजय थेराडे यांच्यावर “वोट चोरी”चे गंभीर आरोप करण्यात आले होते. काँग्रेसने थेराडे यांचे नाव दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये असल्याचा दावा करत, त्यातील एका मतदार यादीतील पत्त्याबाबत मोठा खुलासा केला होता.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, ज्या इमारतीत थेराडे यांचे नाव नोंदवले आहे, ती इमारत केवळ तीन मजली असूनही त्यांच्या मतदार यादीतील पत्ता चौथ्या मजल्याचा असल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदार नोंदणीमध्ये गोंधळ करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.
मात्र, या सर्व आरोपांवर आज नगरसेवक संजय थेराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी काँग्रेसवर पलटवार करत म्हटले की, “१३ वर्षांपूर्वी जुना पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या राजदीप व्हिलामध्ये शंभराहून अधिक नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली होती. यातील बहुतांश नावे बांगलादेशी नागरिकांची होती. त्या वेळी काँग्रेसच सत्तेत होती, पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही.”
थेराडे यांनी पुढे आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, “काँग्रेसच्या माजी नगरसेविका गीता परदेशी यांचे स्वतःचे नावसुद्धा दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार यादीत आहे. मात्र आम्ही त्यावर आरोप करत नाही, कारण अशा चुका निवडणूक आयोगाच्या तांत्रिक त्रुटीमुळे घडू शकतात.”भाजप नगरसेवकांनी काँग्रेसवर टीका करत सांगितले की, “काँग्रेसकडे जनतेसाठी दाखवण्यासारखे कोणतेही विकासकाम नाही. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.”
थेराडे यांनी काँग्रेस नेत्यांना सल्ला देत म्हटले की, “विकासकामांवर लक्ष केंद्रित करा, आपल्या मतदारसंघात काम करा. लोकांचे प्रश्न सोडवा. केवळ आरोप करून काही साध्य होणार नाही. जनतेने सर्व पाहिले आहे.”शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “मी कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नाही. माझे नाव मतदार यादीत योग्य पद्धतीने नोंदले गेले आहे आणि निवडणूक आयोगाकडे सर्व कागदपत्रे सादर केली आहेत.” दरम्यान, काँग्रेसकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे भाईंदरच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय आणखी रंग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.