
शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न (photo Credit- X)
आदित्य ठाकरे यांनी भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या व्हायरल व्हिडिओचा दाखला दिला. आमची मुंबईत सत्ता येणार… मोदी साहेब भाजपचा जलवा दिसणार… अशा शब्दांत फडणवीसांचा आवाज काढत त्यांनी मिमिक्री केली. तसेच, लाव रे तो फोटो म्हणत त्यांनी राज ठाकरेंची स्टाईल मारली आणि कोस्टल रोडच्या कामाचे श्रेय लाटणाऱ्या भाजपला सवाल केला. राज ठाकरे माझे काका आहेत, त्यांच्याकडून थोडी लिबर्टी घेतो, असे म्हणत त्यांनी कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचे फोटो दाखवले. फडणवीस साहेब, यात तुम्ही कुठे आहात? ३००० रुपये देतो म्हणताय, पण विकासकामात तुमचे योगदान काय? असे थेट आव्हान आदित्य यांनी दिले.
भाजपच्या होर्डिंगवर असलेल्या दोन चेहऱ्यांनी (शिंदे-फडणवीस) मुंबईसाठी काय केले? असा सवाल करत आदित्य यांनी ‘गिफ्ट सिटी’ आणि महत्त्वाचे उद्योगधंदे गुजरातला नेल्याचा आरोप केला. दुसऱ्या बाजूला असलेले पक्ष नाहीत, तर त्या टोळ्या आहेत, अशा शब्दात त्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर हल्ला चढवला.
आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भारावून गेले. त्यांनी आदित्य यांचे भरभरून कौतुक करत म्हटले, उद्धवजी, आता तुम्ही महाराष्ट्र सांभाळायला मोकळे झालात. मुंबईची खडानखडा माहिती असलेलं इतकं अभ्यासू भाषण आदित्यने केलंय की, तो आता मुंबई सांभाळायला पूर्णपणे सक्षम आहे.