
१७ वर्षांनंतर नवी मुंबईला मिळणार महिला महापौर
नवी मुंबई / सिद्धेश प्रधान : राज्यातील होणाऱ्या महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि.२२) पार पडली. या महापौरपदाच्या आरक्षणात नवी मुंबईसाठी महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले. त्यामुळे पुरुष सत्ताक राजकारणात तब्बल १७ वर्षांनंतर नवी मुंबई शहरात महिला महापौरपद भूषविताना व सत्ता हाकताना दिसणार आहेत.
दुसरीकडे, गणेश नाईक यांनी माजी महापौर सागर नाईक यांना उमेदवारी देत पुन्हा पुतण्याकडे पालिकेची सूत्रे हातात देण्याची व्यूहरचना आखल्याचे संकेत दिले होते. मात्र, महापौरपद महिला खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने सध्या तरी सागर नाईकांना महापौरपदाची हुलकावणी दिली असली तरी अडीच वर्षांनी पुन्हा नाईक घराण्यात हे महापौरपद जाण्याची शक्यता आहे. राज्यातील नवी मुंबई महापालिका निवडणुका पार पडताच महापौर आरक्षणाची सोडत पार पडली.
१११ पैकी तब्बल ६३ महिला
१११ जागांसाठी २८ प्रभागांमध्ये निवडणुक पार पडली. यामध्ये ६५ जागी भाजप, ४२ जागी शिवसेना, २ जागी उबाठा, मनसे आणि अपक्ष प्रत्येकी १ नगरसेवक निवडून आले आहेत. या १११ जागांवर ६३ महिला नगरसेविका तर ४९ पुरुष नगरसेवक आहेत. त्यामुळे महापालिकेत महिलाराज पाहायला मिळणार आहे. भाजपच्या ६५ जागा आल्या असून, त्यात ३६ महिलांचा समावेश आहे. शिवसेनेच्या ४२ जागा आल्या त्यापैकी २६ महिला आहेत. यात २ जोड्या माय-लेक, १ काकी-पुतणी अशा आहेत.
वनमंत्र्यांच्या सुसूत्रतेमुळे भाजपला मिळाले बहुमत
यात नवी मुंबई महापालिकेची देखील सोडत काढण्यात आली. महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले. एकीकडे पालिका निवडणुकीत ५० टक्के महिला आरक्षण देण्यात आले आहे. यात आता महापौरपद देखील महिला राखीव आल्याने व यंदा महिलांची संख्या पुरुष नगरसेवकांपेक्षा जास्त असल्याने पालिकेच्या सभागृहात महिलाराज पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत वनमंत्री गणेश नाईकांच्या सुसूत्रतेनुसार भाजपाने एकनाथ शिंदेना चीतपट करत विजयश्री खेचून आणत बहुमत मिळवले.
महापौराच्या शर्यतीतील महिला उमेदवार
२०२६ ते २०३१ या पाच वर्षाच्या महापौरपदाच्या शर्यतीत स्थायी समितीच्या माजी सभापती व अनुभवी नगरसेविका नेत्रा शिर्के यांचे नाव आघाडीवर आहे. नेत्रा शिर्के खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. यासह माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या भगिनी भारती पाटील, तुर्भे गावातील अनुभवी नगरसेविका माजी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, कोपरखैरणेतील अनुभवी व अभ्यासू नगरसेविका सायली शिंदे, यासह सूरज पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील, माधुरी सुतार तसेच नाईक परिवारातील गणेश नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांची नावे चर्चेत आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Mayor Reservation : महाराष्ट्रात महिलांचे वर्चस्व; २९ पैकी १५ महापालिकेवर ‘महिला राज’