शेवगावमध्ये शिवसेनेत फूट (फोटो- ians)
शेवगाव नगरपरिषदेच्या राजकारणात शिवसेनेची अवस्था ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’
शहरात शिवसेनेचे तीन-तीन वेगवेगळे गट सक्रिय झाल्याचे उघड
अंतर्गत धुसफुसीमुळे शेवगावची जनता पूर्णपणे संभ्रमात
पोपट पिटेकर/ Maharashtra Politics: अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव नगरपरिषदेच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची अवस्था ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशी झाली आहे. एका बाजूला पक्षाकडे नगराध्यक्ष आणि चार नगरसेवक असताना, प्रत्यक्षात मात्र शहरात शिवसेनेचे तीन-तीन वेगवेगळे गट सक्रिय झाल्याचे उघड झाले असून, या अंतर्गत धुसफुसीमुळे शेवगावची जनता पूर्णपणे संभ्रमात पडली आहे.
नगराध्यक्षपदापासून ते स्वीकृत नगरसेवकापर्यंत सत्तेचं बळ, पण विसंवाद टोकाला!- शेवगावच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेतून थेट निवडून आलेला शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष माया मुंढे या पदामुळे पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण होणे अपेक्षित होते. याशिवाय अमर पुरनाळे, आशुतोष डहाळे, शिवानी काथवडे यांच्या रूपाने नगरसेवक आणि साईनाथ आखाट यांच्या रूपाने स्वीकृत नगरसेवक असे तगडे बळ पाठीशी असतानाही, अवघ्या काही महिन्यांतच पक्षात गटबाजीचे काळे ढग दाटले आहेत.
व्हायरल बॅनरने उघड केला पक्षांतर्गत विसंवाद; मुंढेंचे नाव गायब!- शेवगावात नुकताच एक अभिनंदनपर बॅनर्स चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. शेवगाव नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाच्या ‘गटनेतेपदी’ अमरभैया पुरनाळे यांच्या निवडीनिमित्त लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर साईनाथ आधाट,युवासेना जिल्हाप्रमुख/नगरसेवक, आशुतोष डहाळे तालुकाध्यक्ष/नगरसेवक, आणि शिवानी रोहित काथवडे,नगरसेविकायांची नावे व छायाचित्रे झळकली आहेत. परंतु, या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणारे अरुण मुंढे आणि नगराध्यक्ष माया मुंढे यांचे नाव किंवा फोटो या अधिकृत बॅनर्सवरून जाणीवपूर्वक टाळल्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे. यामुळे शिवसेनेत एक नाही तर दोन-तीन समांतर गट कार्यरत असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
कामातील ‘टक्केवारी’ आणि वर्चस्वाचा लढा?- शेवगावच्या राजकीय वर्तुळातून मिळणाऱ्या माहितीनुसार, पक्षातील ही अंतर्हत कलह आणि विसंवाद केवळ वैचारिक नसून विकासकामांमध्ये मिळणाऱ्या ‘टक्केवारी’ आणि आपापल्या हद्द्याच्या वर्चस्वावरून असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे अरुण मुंढे हे स्वतःला भावी आमदार समजून ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यांना आपले मूळ ४ नगरसेवकही व्यवस्थित हाताळता येत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे, पक्षात प्रवेश केलेले इतर नेते आणि हर्षदाताई काकडे यांचे वेगळे राजकारण सुरू असल्यामुळे पक्षाची ताकद वाढण्याऐवजी ती आपापसातच तुटताना दिसत आहे.
एकाच पक्षाच्या मंडळींमध्ये सुरू असलेल्या या सुप्त लाटा आणि अंतर्गत धुसफुसीमुळे शेवगाव शहरातील विकासाचा बोजवारा उडाला आहे. जनात शिवसेना आणि मनात मात्र गटबाजी असा दुहेरी खेळ खेळणाऱ्या या नेत्यांमुळे सर्वसामान्य जनतेचा विकास रखडला असून, आगामी काळात शेवगाव नगरपरिषदेचा कारभार कसा चालणार? असा तीव्र संताप नागरिक व्यक्त करत आहेत. आता या प्रकरणी शिवसेना पक्षश्रेष्ठी नेमकी काय भूमिका घेणार? आणि शेवगावच्या या विखुरलेल्या शिंदेंच्या शिलेदारांना एकत्र आणण्यासाठी कोणता मोठा निर्णय घेतला जाणार? याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
Ans: शेवगाव शहरात शिवसेनेचे तीन-तीन वेगवेगळे गट सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे.
Ans: शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शिवसेनेच्या माया मुंढे आहेत.






