
Eknath Shinde
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद परांजपे यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे. ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, एक शिवसैनिक म्हणून माझी देखील इच्छा आहे’, असं परांजपे यांनी म्हटलं आहे.
मात्र, त्याचवेळी त्यांनी लोकशाहीमध्ये आकड्यांना महत्त्व असल्याचंही स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असं वाटणं स्वाभाविक असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे परांजपे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आगामी निवडणुका स्वबळावर लढणार की महायुतीसोबत, याबाबतही आनंद परांजपे यांनी भाष्य केलं. ‘आत्ताच सांगायला मी काही ज्योतिषी नाही. मात्र दोन्हीसाठी शिवसेना सज्ज आहे,’ असं ते म्हणाले. निवडणुकीबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आनंद परांजपे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. प्रत्येक बूथवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद मजबूत असावी आणि पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असावा, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झालं आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेतील काही नेत्यांकडून वेळोवेळी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
आता आनंद परांजपे यांनीही ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’ असं वक्तव्य केल्याने या मुद्द्याची पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आगामी निवडणुकांनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत नेमकं काय समीकरण असेल, याबाबत कोणताही निर्णय सध्या जाहीर झालेला नाही.