
anna hajare on manoj jarange
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून आज त्यांच्या आंदोलनाचा तेरावा दिवस आहे. मराठा-कुणबी आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे आक्रमक भूमिका घेत आहेत. सुरुवातीला त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला होता. मात्र, सरकारच्या प्रतिनिधींनी विनंती केल्यानंतर त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली असून सलाइनही लावून घेतली आहे. सलग तेरा दिवसांच्या उपोषणामुळे त्यांच्या वजनातही घट झाली आहे.
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने अण्णा हजारेंना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर गुरुवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
डिस्चार्जनंतर माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणाच्या अनुभवाचाही दाखला दिला. ‘मी आयुष्यात २२ उपोषणं केली. उपोषणामुळे तब्येत ठणठणीत राहते. उपोषण हे समाजासाठी, देशासाठी असलं पाहिजे,’ असं अण्णा हजारे यांनी म्हटलं. आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण आयुष्यात दहा कायदे मंजूर करून घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे उपोषण करताना त्यामागचा उद्देश समाजहिताचा असावा, असा त्यांचा सूर होता.
मनोज जरांगे यांचं आंदोलन सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. सरकार आणि जरांगे यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना अण्णा हजारेंच्या या वक्तव्याकडे महत्त्वाचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे, स्वतः अनेकदा उपोषणाचं हत्यार वापरलेल्या अण्णांनी आपला अनुभव सांगत आंदोलनाच्या उद्देशावर भर दिला आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना ‘भाऊ’ म्हणून संबोधल्यानंतर या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. जरांगेंनीही यावर प्रतिक्रिया देताना भाऊबीजेच्या निमित्ताने भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
‘संकटाच्या काळात बहिणीने भावाला पाठिंबा द्यावा,’ असं म्हणत जरांगे यांनी अमृता फडणवीस यांच्याशी भाऊ-बहिणीचं नातं जपण्याची भूमिका व्यक्त केली. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबतच या राजकीय घडामोडींकडेही सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.