
Pratap Sarnaik
Pratap Sarnaik on Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते यांच्या जोरदार आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अश्यातच आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनोज जरंगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रताप सरनाईक यांनी जरांगेंना थेट राजकीय सल्ला दिला आहे. मनोज जरांगे यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करावा, असं सरनाईक म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर टीका केली. जरांगे हे जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एखादा राजकीय नेता मोठा होत जातो, तसतशी त्याच्यावर टीकाही वाढते, असं मत सरनाईक यांनी व्यक्त केलं.
मराठा समाजाला सर्वाधिक न्याय एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचा दावाही त्यांनी केला. जरांगेंना राजकीय भूमिका मांडायची असेल, तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, असा खोचक सल्ला सरनाईक यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी एक ऑडिओ क्लिप समोर आणली होती. या क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी रुपये दिल्याचा दावा केल्याचं सांगितलं जात आहे. या क्लिपवरून जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सवाल उपस्थित केले होते. त्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी जरांगेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे महायुतीमधील राजकीय वातावरण आणखी तापल्याचं चित्र आहे.
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरही सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. ही हत्या गंभीर असल्याचं सांगत सरकारने चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी नमूद केलं. या घटनेचा राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. सप्टेंबर 2026 मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी महामंडळाला 391 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आहे.
आता या निधीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कितपत मार्गी लागतो, याकडे लक्ष असेल. दुसरीकडे, जरांगे यांच्या कथित क्लिपवरून सुरू असलेला वाद पुढे कोणतं वळण घेतो, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ans: प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगे यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करावा, असा सल्ला दिला. जरांगे हे जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Ans: कथित क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी रुपये दिल्याचा दावा केल्याचं सांगितलं जात आहे.
Ans: सप्टेंबर 2026 मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठी एसटी महामंडळाला 391 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे.