
भारतीय जनता पक्षाने विचारधारेत कधी तडजोड केली नाही
सातारा : राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवून सातत्याने धोरणांची अंमलबजावणी केल्यामुळे भारतीय जनता पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा ठरला आहे. गेल्या ४७ वर्षांत पक्षाने आपल्या विचारधारेत कधीही तडजोड केलेली नाही, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
हॉटेल लेक व्ह्यू येथे भाजपचा ४७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, माजी आमदार दिलीप येळगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, “पक्षाच्या वाटचालीत अथक परिश्रम आणि स्पष्ट धोरणे यामुळेच केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली. राम मंदिर उभारणी आणि कलम ३७० रद्द करणे हे महत्त्वाचे निर्णय प्रत्यक्षात आले असून समान नागरी कायद्याचा विषय पुढे मार्गी लागेल.” कार्यकर्त्यांनी पक्ष विस्तार करताना विचारधारेशी प्रामाणिक राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी ६ ते १५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर भाजपचा झेंडा लावावा, ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त बूथ स्तरावर कार्यक्रम आयोजित करावेत तसेच ग्रामीण व शहरी भागात फिरून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात भाजपचे अडीच लाख सदस्य सक्रीय
दुसरीकडे, राज्यात पक्षाचे आज दीड कोटी सदस्य आणि अडीच लाख सक्रिय सदस्य कार्यरत आहे. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढील वर्षभराचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. फेक नरेटिव्हमुळे भाजपचे सन २०२४ लोकसभा निवडणुकीत प्रचंड नुकसान झाले. वाऱ्यासारखा हा फेक नरेटिव्ह पसरला. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये याकरिता डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यकर्त्यांनी आता सक्रियपणे कार्यरत राहिले पाहिजे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुण्यात विधान केले.