
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी; 'या' नेत्याच्या प्रवेशाने मिळाले बळ
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापू लागले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यात सध्या वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली आहे. तालुक्यातील दोन गट आणि चार गणांमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपच्या गोटात सध्या बैठकांचा धडाका सुरू झाला असून, संभाव्य उमेदवारांची चाचपणी युद्धपातळीवर केली जात आहे.
तालुक्यातील अनुभवी आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. बावळेकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आता संपूर्ण तालुक्यात भाजपचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. महाबळेश्वर नगरपालिकेत भाजपचे अस्तित्व निर्माण करणारे नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांच्यासह तालुक्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी आता मैदानात उतरली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या या रणसंग्रामात भाजपने कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली आहे. यामध्ये बबन उतेकर, अनिल भिलारे, रवींद्र शिंदे, लक्ष्मण चोरगे, लक्ष्मण कदम, जगन्नाथ भिलारे, उषा ओंबळे, शशिकांत मोरे, अनिल गायकवाड, एकनाथ साळवी, राजाराम धामुसने, मंगेश साळेकर, मंगेश नाविलकर, मंगेश घाडगे, राजेंद्र पवार, गजानन फळणे, ओंकार दीक्षित, चिन्मय आगरकर, सनी मोरे आणि तुषार मोरे यांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी
या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक गण आणि गटात बैठकांचे सत्र सुरू आहे. स्थानिक जनतेचा कल, उमेदवाराची जनसंपर्क क्षमता आणि संघटनात्मक बांधणी या निकषांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
बदलाचे वारे आणि ‘विकास’ हाच अजेंडा
महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड असली, तरी यावेळी भाजपने दिलेले आव्हान हे कडवे असणार आहे. ‘विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही’ हा संदेश तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने विशेष रणनीती आखली आहे. या जोरदार तयारीमुळे आगामी निवडणुकांमध्ये महाबळेश्वर तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विकासाचा खरा चेहरा हवा
“आम्ही एकही जागा राष्ट्रवादीला एकतर्फी देऊ देणार नाही. ही निवडणूक केवळ लढण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठीच लढणार आहोत. तालुक्यातील जनतेला आता विकासाचा खरा चेहरा हवा आहे. निष्क्रिय नेतृत्वाला घरचा रस्ता दाखवून भाजपच्या माध्यमातून परिवर्तनाची लाट आणण्यासाठी जनता सज्ज झाली आहे.”
– डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष, महाबळेश्वर.