शरद पवारांना मोठा धक्का! माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी
माजी आमदार कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिलेल्या राजिनामा पत्रात म्हटलं की, मी १९८४ सालापासून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. १९९९ साली राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो. विधानसभा मतदार संघात तळागाळात काम करून मतदार संघात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले. २००४ साली विधानसभा निवडणुकीत निवडून आलो व त्या अगोदर ३५ वर्षे नगरसेवक व साडे नऊ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम करून तालुक्यामध्ये पक्ष संघटना मजबूत केली. मंडणगड पासून राजापूर पर्यंत पक्षाचे अनेक कार्यकर्ते निर्माण केले. पक्षाच्या आदेशाप्रमाणे २०१४ साली रायगड लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली व १,३०,००० मते मिळाली.
पक्षाच्या विभाजना नंतर पक्षाने चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात नवखा (नवीन) उमेदवार दिला. तरिही त्या उमेदवाराचे रात्रंदिवस काम करून उमेदवाराला विजयापर्यंत नेऊ शकलो. एवढे योगदान देऊन सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी विनंती केल्याप्रमाणे पक्षाची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे तत्कालीन प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र स्विकारण्यासाठी मुंबई येथे पक्षाच्या प्रधान कार्यालयात बोलावले. त्याप्रमाणे निवडक कार्यकर्ते घेऊन पत्र स्वीकारण्यास गेलो तेव्हा सध्याच्या जिल्हाध्यक्षांना कार्यालयातील कुणीतरी पदाधिकाऱ्यांनी फ़ोनकरून मला पत्र देण्यास विरोध करण्यासाठी कार्यालयात कार्यकर्ते घेऊन बोलावून घेतले. जिल्हाध्यक्ष्यांनी त्यांच्या मर्जीतील १० ते १२ कार्यकर्ते पक्ष कार्यालयात घेऊन आले आणि माझ्या नियुक्तीला विरोध केला.
प्रांताध्यक्ष्यांनी नियुक्तीचे पत्र तुम्हाला नंतर देऊ असे सांगून परत पाठवले. त्यामुळे माझ्यासारख्या पक्ष स्थापनेपासून पक्षाचे एकनिष्ठ काम करीत असलेल्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्यात आले. आजतागायत त्या बाबतीतील निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घेतला नाही. तरीसुद्धा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे पक्षाची हानी होऊ नये म्हणून निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरवात केली. स्वतः कार्यकर्त्यांना उभारी देणेसाठी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला. बाकीचे उमेदवार पक्षामार्फत उभे केले. महाविकास आघाडीमध्ये एकत्र करण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यामध्ये यश येऊ शकले नाही. याबाबत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत आघाडी करणेबाबत वरिष्ठ पातळीवरून काहीच प्रयत्न करण्यात आला नाही. साधा फ़ोन करण्याचीही सहानभूती वरिष्ठ पातळीवरून दाखवण्यात आली नाही.
धन शक्तीचा फार मोठा वापर समोरच्या बाजूने होत असताना पक्षाने चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणतीच दखल घेतली नाही. तरीसुद्धा एकही पैसा खर्च न करता १०५०० (साडेदहा हजार) मतदान नागरिकांनी मला केले. अल्पश्या मताने मला पराजयाला सामोरे जावे लागले. पक्षाच्या कठीण परिस्थिती मध्ये लढा देत असताना पक्षाने मात्र मला प्रामाणिकपणे काम करीत असताना सुद्धा एकाकी पाडले. त्यामुळे पक्षाला आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज नाही, अशी माझी खात्री झाली आहे. त्यामुळे नाईलाजाने मी प्रांतिकच्या उपाध्यक्ष पदाचा व पक्ष सदसत्वाचा राजीनामा देत आहे. हा माझा अंतिम निर्णय आहे. आदरणीय पवार साहेबांवर माझी निष्ठा आहे, परंतु अन्य नेत्यांकडून मला कोणतेही सहकार्य मिळालेले नाही.
माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यावर त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता 15 दिवस शांत बसणार आहे त्यानंतर योग्य तो निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली मात्र प्रसार माध्यमासमोर येऊन प्रतिक्रिया देणे टाळले त्यामुळे रमेश कदम नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .






