खोपोलीत भाजपाला मोठा धक्का
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून तयारीही केली जात आहे. त्यातच काही नेते पक्षही सोडताना दिसत आहे. असे असताना आता खोपोलीत आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील आणि खोपोली शहराध्यक्ष राहुल जाधव यांनी पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून या दोन्ही नेत्यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा असून, आणखी दोन नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने खोपोलीत भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबर रोजी या दोघांनीही जिल्हाध्यक्षांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. खोपोली शहर भाजपमध्ये पहिल्या फळीतील नेतृत्व करणाऱ्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणास्तव काम करणे शक्य नसल्याने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Nashik Shetkari Aakrosh Morcha : गळ्यात कांद्याची माळ घालत रोहित पवार आक्रमक; नाशिकमध्ये घुमला शेतकरी आक्रोश
असे जरी असले तरी राजीनाम्यामागील खरं कारण खोपोली भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसात खोपोली भाजपामध्ये झालेल्या पक्षप्रवेशाने भाजपमध्ये दोन गट पडले होते. त्यातून सुरु झालेल्या सुप्त संघर्षाचा फटका भाजपला आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता असून, भाजपच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन माजी नगरसेवकही पक्ष सोडण्याच्या तयारीत
स्वराज्य संस्था स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अश्विनी पाटील आणि राहुल जाधव यांचा राजीनामा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून दोन माजी नगरसेवक देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असल्याने खोपोली भाजपमधील असंतोष अधिक ठळक होत असून, निवडणुकीच्या तोंडावर भाजपची पडझड सुरू झाल्याची चर्चा आहे. आता भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अश्विनी पाटील आणि राहुल जाधव कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात याकडे खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा : Tejashwi Yadav FIR : लाडकी माई योजनेमध्ये झाला मोठा घोटाळा? फसवणूक प्रकरणी तेजस्वी यादव यांच्यावर FIR दाखल