
भाजपसह काँग्रेससमोर अंतर्गत बंडाचे मोठे आव्हान
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीत यंदा तिकीट वाटपानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना कार्यकर्त्यांच्या तीव्र नाराजीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः भाजपमध्ये असंतोष अधिक ठळकपणे समोर आला. ही नाराजी थेट निवडणूक निकालांवर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नामनिर्देशन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बंडखोर उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.
काही प्रभागांत बंडखोरी थांबविण्यात यश आले. मात्र, अनेक ठिकाणी बंडखोर नेत्यांचेही न ऐकता अधिकृत उमेदवारांविरुद्धच निवडणूक रिंगणात ठाम राहिले. काँग्रेसमध्येही हीच स्थिती असून, असंतुष्ट उमेदवार व कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पक्षनेते धावपळ करताना दिसले. राजकीय जाणकारांच्या मते, यंदा बंडखोर उमेदवारांपेक्षा नाराज कार्यकर्ते अधिक धोकादायक ठरेल. पसंतीच्या उमेदवाराला तिकीट न मिळाल्याने अनेक प्रभागांत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष असून, तो उघडपणे व्यक्त केला जात आहे. दक्षिण नागपुरातील मानेवाडा परिसरात सत्ताधारी पक्षाने उमेदवार लादल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि विशेषत: ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
स्थानिक वस्तीतील अनुभवी कार्यकर्त्याला डावलून दुसऱ्या भागातील उमेदवाराला संधी देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या नाराजीमुळे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या सोशल मीडियाच्या ग्रुपमधून बाहेर पडल्याची माहिती आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या उमेदवाराचे तिकीट कापल्यानेही असंतोष वाढला असून, त्याचा फटका अधिकृत उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘साम-दाम’ नीतीचा वापर
बंडखोर उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी समजूतदारपणासोबतच विविध प्रलोभनांचा वापर झाल्याचीही चर्चा आहे. काही प्रभागांत छोट्या पक्षांच्या उमेदवारांशी सौदेबाजी करून त्यांना निवडणूक मैदानातून माघार घ्यायला लावल्याचे बोलले जात आहे. काही जण तर अशाच व्यवहाराच्या अपेक्षेने नामनिर्देशन दाखल करतात, अशीही चर्चा दबक्या आवाजात आहे.
मतदानाच्या दिवशी अडथळ्यांची शक्यता
काही ठिकाणी प्रमुख प्रतिस्पर्ध्यांची मते कापण्यासाठी ‘डमी’ उमेदवार उभे केल्याचीही चर्चा असून, त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मदत केल्याचे बोलले जाते. मात्र, उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते पक्षाच्या या भूमिकेमुळे नाराज असून, मतदानाच्या दिवशी अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘मतदानाच्या दिवशी पाहू’ असा इशारा
एका ज्येष्ठ नगरसेवकाची उमेदवारी मागे घेतल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी जाहीरपणे ‘मतदानाच्या दिवशी काय करायचे ते पाहू’, असा इशाराच दिला. जर हा रोष कायम राहिला, तर अधिकृत उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, काँग्रेसमध्येही काही प्रभागांत असंतोष कायम असून, तिकीट वाटपामुळे भाजपला अप्रत्यक्ष फायदा होईल, असा आरोप पक्षातीलच एका गटाकडून केला जात आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही नाराजी
काँग्रेसच्या महाविकास आघाडीतील सहयोगी राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडूनही अशाच स्वरुपाचे आरोप होत आहेत. तिकीट न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील नाराजी अद्याप शमली नसल्याने ही नाराजी घातक ठरू शकते, असे चित्र आहे.