ठाण्यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना झोडपले
भाजपकडून शहरभर लावलेल्या मोठमोठ्या होर्डिंगवर “गती आहे विकासाची, भाजपा आपली विश्वासाची” असे लिहिले आहे. याच घोषवाक्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “ही विकासाची नाही, तर विनाशाची गती आहे.” भाजपच्या कार्यकाळात मुंबई आणि ठाण्याचा सर्वांगीण विकास न होता विनाशच होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. यावर भाष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले की, मुलुंड परिसरात भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी मेट्रो प्रकल्पाची पाहणी केली असता, सुमारे 100 ठिकाणी वायू प्रदूषणाचे नियम विकासकांकडून धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले. याच कारणामुळे मुंबईत श्वास घेणेही धोकादायक बनत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ ही योजना महाविकास आघाडीच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. मात्र सत्ता बदलल्यानंतर या सरकारने या योजनेकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. ठाण्यात तर ‘आपला दवाखाना’मध्ये साड्यांचे दुकान थाटण्यात आल्याचे सांगत, “त्या साड्या त्या गद्दाराला नेसा,” असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.
Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?
भाजपकडून “महापौर हिंदूच होणार” असे विधान करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही मराठी माणसाला हिंदू मानत नाही का?” शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगताना ते म्हणाले, “देशामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत.”
“आम्ही तुम्हाला बांधील आहोत, भाजपा आणि अदानीला नाही!”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला पुन्हा एकदा साद घातली.






