
Chhatrapati Sugar Factory, Prithviraj Jachak,
सभासदांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आपण कारखान्याच्या हितासाठी स्वतःला विकेन, मात्र छत्रपती कारखाना पैसे अभावी बंद पडू देणार नाही, असा पुनरुच्चार करत कारखान्याच्या कारभारामध्ये माझ्याकडून काही चुकीचे काही घडल्यास मला सभासदांनी जाहीर फाशी द्या, असे आव्हान यावेळी दिले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ६६ वी वार्षिक सभा कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर, यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, अविनाश घोलप, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर, संचालक कैलास गावडे, डॉ. योगेश पाटील, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, कार्यकारी संचालक अशोक जाधव, महाव्यवस्थापक हनुमंत करवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी मागील हंगामात इतर कारखान्यांच्या तुलनेत छत्रपतीने चांगला दर दिला असल्याचे सांगून, या हंगामात देखील चांगला दर आपण देऊ, मात्र छत्रपती वाचवण्यासाठी सभासदांनी छत्रपतीलाच ऊस द्यावा, असे आवाहन केले. दरम्यान, कारखान्याने केलेल्या गाळ्यांच्या भाडेवाढीवरून गोंधळ उडाला. काही सभासदांनी ही भाडेवाढ योग्य नसल्याचे सांगितले. यावर पृथ्वीराज जाचक यांनी आतापर्यंत कोणतीही भाडेवाढ केली नाही, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कारखान्याच्या हितासाठी ही भाडेवाढ केली आहे, असे सांगितले.
यावर विशाल निंबाळकर यांच्यासह इतर सभासदांनी आम्हाला गाळा द्या, आम्ही वीस हजार रुपये भाडे देतो, असे सांगितले. यावरून पोट भाडेकरू काढून ते गाळे कारखान्यात जमा केले जातील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. सतीश काटे यांच्यासह इतर सभासदांनी कारखान्याला उष्ण घालणाऱ्या सभासदांना साखर देऊ नये, अशी मागणी केली. यावरून इतर सभासदांनी देखील विविध मुद्दे मांडले, त्यामुळे सभासदांची केवायसी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तानाजीराव थोरात यांनी लेखापरीक्षणातील काही त्रुटींवर अक्षय घेऊन प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावरून पृथ्वीराज जाचक यांनी आपण एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार केला, तरी मला या ठिकाणी फाशी द्या, असे जाहीर आव्हान दिले.
या सभेत उड्डाणपुलाची उंची वाढवणे, बुलेट ट्रेनचा मार्ग जिरायती भागातून वळवणे, भवानीनगर आरोग्य केंद्रासाठी जागा देणे, जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करणे, लासुर्णेतील नीळकंठेश्वर विद्यालयाची जागा रयत शिक्षण संस्थेला देणे, अंथुर्णेमधील २ एकर जागा परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, यासह एकूण ११ विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी शंकरराव रुपनवर, रणजीत निंबाळकर, ॲड. प्रशांत पवार, उमेश सपकाळ, अमोल भोईटे, अमरसिंह कदम, रामभाऊ जामदार, ॲड. नीती कदम, बाळासाहेब शिंदे, रवींद्र टकले आदींनी विविध सूचना मांडल्या.