
फोटो सौजन्य AI
युक्रेनच्या सैन्याला ड्रोन पुरवणाऱ्या जर्मनीतील क्वांटम सिस्टम्स ( Quantum Systems ) या संरक्षण तंत्रज्ञान कंपनीवर अज्ञात हल्लेखोरांनी सायबर हल्ला केला आहे . कंपनीने १२ नोव्हेंबर रोजी या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली . या घटनेनंतर जर्मन सैन्याने खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीच्या ड्रोनचा वापर तात्पुरता थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे . त्यामुळे युरोपमधील संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे .
म्युनिकजवळील गिल्चिंग येथे मुख्यालय असलेल्या क्वांटम सिस्टम्स कंपनीने ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सायबर सुरक्षेतील घुसखोरी ओळखली . कंपनीच्या अंतर्गत तपासात अज्ञात आणि शत्रू कडून सायबर हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले .
मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी कंपनीच्या QBase या ड्रोन नियंत्रण आणि मोहिमेचे नियोजन करणाऱ्या सॉफ्टवेअरच्या अपडेट सर्व्हरमध्ये घुसखोरी करून मालवेअर असलेली फाईल पाठवली . ही फाईल नियमित सॉफ्टवेअर अपडेट असल्याचे भासवण्यात आले होते . त्यामुळे ग्राहकांच्या नेटवर्कपर्यंत संभाव्य धोका पोहोचला . मात्र ही फाईल प्रत्यक्ष ड्रोनमध्ये स्थापित झाल्याची माहिती नाही .
या सायबर हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर जर्मनीच्या सशस्त्र दलाने क्वांटम सिस्टम्सच्या ड्रोनचा वापर खबरदारी म्हणून थांबवला . त्यामुळे कंपनीला एका नियोजित लष्करी सरावातही सहभागी होता आले नसल्याचे समजते आहे . या प्रकरणाचा तपास जर्मनीच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेसह देशांतर्गत सुरक्षा आणि सायबर सुरक्षा संस्थांकडून सुरु असल्याचे वृत्त आहे . दरम्यान हल्लेखोर नेमके कोण होते आणि त्यांचा उद्देश काय होता , हे अजूनही स्पष्ट झालेले नाही . या हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा अधिकृत निष्कर्षही अजून समोर आलेला नाही .
क्वांटम सिस्टम्सने आपल्या आयटी आणि सुरक्षा पथकांनी सरकारी यंत्रणांच्या सहकार्याने हा धोका नियंत्रणात आणल्याचे स्पष्ट केले आहे . कंपनीच्या म्हणण्यानुसार , या घटनेमुळे ड्रोन वापरणाऱ्या ग्राहकांना किंवा ऑपरेटर्सना कोणताही धोका नाही . १३ नोव्हेंबरला कंपनीच्या प्रवक्त्याने जगभरातील ड्रोन फ्लीट पुन्हा सामान्यपणे काम करत असल्याचे सांगितले आहे .
यावर जर्मन सैन्याने खबरदारी म्हणून ड्रोनचा वापर थांबवला होता , तर इतर ग्राहकांच्या ड्रोन सेवांवर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले नाही . दरम्यान युक्रेनमध्ये ड्रोन उत्पादन आणि संयुक्त प्रकल्पामध्येही कंपनी सहभागी आहे . त्यामुळे या हल्ल्यामुळे युक्रेनला होणाऱ्या आगामी संरक्षण पुरवठ्यावर काय परिणाम होतो , याकडे लक्ष लागले आहे .