
CM Devendra Fadnavis aggressive on MLA Abhimanyu Pawar for mention of Ladki Bahin yojana
Winter Session 2025 : नागपूर : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. उपराजधानी नागपूरमधील विधीमंडळामध्ये हे अधिवेशन सुरु असून विविध विषयांवरुन अधिवेशन गाजत आहे. आठवडाभर सुरु असलेल्या या अधिवेशनामध्ये राज्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्या दिवसापासून अधिवेशनामध्ये सक्रीय झालेले दिसत आहे. यानंतर आता फडणवीस यांचा सभागृहातील व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी भरसभागृहामध्ये त्यांचाच आमदाराला सज्जड दम भरला.
महायुतीची चर्चेत राहिलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. महिला सुरक्षा, सबळीकरण आणि सुविधांचा विषय येताच लाडकी बहीण योजनेचा उल्लेख अनेकदा येतोय . सातत्याने लाडकी बहीण योजनेचे नाव काढण्याच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे कान टोचले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावे लागेल, असे खडेबोल देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवारांना भर सभागृहामध्ये सुनावले आहेत. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहातील याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
हे देखील वाचा : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची सभागृहात चर्चा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहामध्ये दारु बंदीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींचा असा उल्लेख केला. अभिमन्यू पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारु ही आहे. आमच्या महिला भगिनी अवैध दारुविक्रीबाबत विचारणा करतात. आपल्या लाडक्या बहिणींचं हे दु:ख आहे. त्यामुळे याबाबत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर गृह विभाग, अन्न औषध प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी निर्देश देऊनही कारवाई झाली नाही, असे अभिमन्यू पवार यांनी म्हटले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना खडेबोल सुनावले.
हे देखील वाचा : “त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा…! सामाजिक नेते बाबा आढाव यांच्यासाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
कोणताही मुद्दा उपस्थित करताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला जात असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. काहीशा रागवलेल्या आवाजात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अध्यक्ष महोदय मी पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका. अन्यथा घरी बसावं लागेल. लाडक्या बहिणींचे पैसे सुरु राहतील, ही योजना बंद होणार नाही. त्या योजनेची तुलना दुसऱ्या योजनेशी करता येत नाही, हे लक्षात ठेवा. विधानसभा अध्यक्षांनी काही निर्देश दिले असतील आणि अंमलबजावणी झाली नसेल तर ती आता तातडीने केली जाईल, असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.