
Maharashtra Politics: "ठाकरेंच्या भाषणात एकही..."; 'त्या' टीकेला CM फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे हे सध्या चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
भाषणात एकही विकासाचा मुद्दा- मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
कोल्हापूर: माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर असून, त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना “दगाबाज रे” असा शब्दप्रयोग केला होता. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, “उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत. पहिल्यांदाच उद्धवजी बाहेर पडले आहेत, याचा आनंद आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. फडणवीस आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांची घोषणा केली. या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “विरोधकांना निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत. मात्र, आम्ही महायुती म्हणून निवडणुकांना सज्ज आहोत. जनता पुन्हा आमच्याच महायुतीलाच कौल देईल.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे राज्य सरकारवर टीका करत आहेत, पण त्यांच्या भाषणात एकही विकासाचा मुद्दा नाही. जो दाखवेल त्याला हजार रुपये बक्षीस देतो. त्यांची स्थिती अशीच आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. शिंदेंच्या उपस्थितीत मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण मंगल कार्यालयात गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वर्षानुवर्षे खड्डेमय असलेल्या रस्त्याचे काम घाईगडबडीत सुरू करण्यात आले आहे.
ठेकेदार अनिल पाटील यांनी सांगितले की, “हे काम दोनच दिवसांपूर्वी मंजूर झाले असून महापालिकेचा उदासीनपणा यामधून स्पष्ट दिसून येतो.” उपमुख्यमंत्री काही तासांत कोल्हापुरात दाखल होणार असून, त्यापूर्वीच रस्त्याचे काम सुरू झाल्याने प्रशासनाच्या हालचालींवर टीका सुरू झाली आहे.
फडणवीसांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न
ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी पाठ फिरवल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.