
रोहा: रायगड जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना (शिंदे गट) अजूनही एकत्र लढण्याच्या भूमिकेवर लाम असली, तरी मित्रपक्षांच्या हालचालींनी तणावाचे वातावरण निर्माण किले आहे. रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरीही महायुतीतील जागावाटप आणि ताळमेळांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. अशातच शिवसेना शिंदे गट), भारतीय जनता पक्ष, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच आमदार महेंद्र दळवींनी खासदार तटकरेंवर फसवल्याचा आरोप करीत टिका केली होती. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. अलीकडेच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, “आम्ही मतभेद बाजूला ठेवून तटकरे यांना दिल्लीला पाठवले, पण त्यांनी आम्हाला फसवले.” या वक्तव्यानंतर महायुतीत पुन्हा एकदा कलगीतुरा पेटला आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर जहरी पलटवार करत, त्यांना ‘डोक्यावर पडलेले आमदार’ असे संबोधले आहे.
“स्वतःला चिटर आमदार म्हणणारे…”
पुढे बोलताना अनिकेत तटकरे म्हणाले, “ते डोक्यावर पडलेत एवढंच मला सांगायचं आहे, बाकी काहीच त्याच्यात वाच्यता करायची नाही.” त्यांनी दळवींना लक्ष्य करत पुढे म्हटले, “स्वतःला ‘चिटर आमदार’ म्हणणारे ते दुसऱ्यांकडेही त्याच नजरेने पाहतात. तटकरे यांनी आणखी दावा केला की, “महायुतीच्या एका बैठकीत दळवींनीच सांगितले होते की, मी चिटर आमदार आहे, मला कोणी काही करू शकत नाही. महाराष्ट्रात सर्वात चिटर आमदार असेल तर तो मीच आहे,” असे विधान त्यांनी केले होते.
राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे
या तीव्र शब्द युद्धामुळे रायगड जिल्ह्यातील महायुतीतील मतभेद अधिकच उफाळून आले असून, येत्या स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. राजकीय वर्तुळात या घडामोडीमुळे चर्चेला उधाण आले असून, महायुतीतील अंतर्गत कलहामुळे प्रचारात कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Politics: रायगडमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच; कोणाला लागणार नगराध्यक्षपदाची लॉटरी?
रायगडमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच
उत्कंठा लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आणि रायगड जिल्हासह महत्त्वाच्या रोहा नगरपालिकेचे निवडणूक वातावरण चांगलेच तापले. मुख्यतः महायुतीतीलच शिवसेना शिंदे गट विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादीतच संघर्षमय तितकाच आरोप प्रत्यारोपांचा सामना पाहायला मिळतो की काय ? या शंकेने सध्या रोह्यात वातावरण मात्र तापलेलं आहे.
शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरेंवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नाहीत. खुद्द तटकरेंच्या होमग्राऊंडवर शिंदे गटाचे तीनही आमदार, पदाधिकारी जुजबी ताकदीची भाषा करीत आलेत. “रोहा बदलणार, लढणार आणि जिंकणार, रोह्यामधील प्रस्थापिकांना हद्दपार करून भगवा फडकविणार”, अशी भीष्म प्रतिज्ञा शिंदे गटाच्या आमदारांनी केली.