Gyanesh Kumar Arrest Demand: वारं फिरलं! ज्ञानेश कुमारांविरोधात लखनऊपासून जम्मूपर्यंत काँग्रेस रस्त्यावर
Congress Protest Against CEC Gyanesh Kumar: काँग्रेस पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपले आंदोलन तीव्र केले आहे. आज, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्ष देशभरात आंदोलन करत आहे. लखनऊ, पाटना, गुवाहाटी आणि जम्मू यांसारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व भाजपविरोधात घोषणाबाजी केली.
जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवले जात नाही आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा या आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने देशभर आंदोलन सुरू केले आहे. कथित ‘मतचोरी’प्रकरणी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी केली.
गुवाहाटी येथे मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते आणि आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे (APCC) अध्यक्ष गौरव गोगोई यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी केली.
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आरोप समोर आल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी, असे गोगोई यांनी म्हटलं आहे.
बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश राम यांनी पाटण्यात आंदोलन केले. राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगासमोर कथित मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत होते. बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्रातील सरकारे कथित ‘मतचोरी’मुळे सत्तेत आल्याचे आता सिद्ध झाल्याचा दावा राजेश राम यांनी केला. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नसल्याचा आरोप करत, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशातही काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवरून राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी कार्यालयाबाहेरील सरकारी फलकावर काळी शाई फासल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर तसेच जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. भारतीय युवा काँग्रेस (IYC) आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले. मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्येही काँग्रेस नेत्यांनी आंदोलन करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
या संपूर्ण वादाला एका माध्यमातील वृत्तानंतर सुरुवात झाली. या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाशी (SIR) संबंधित निर्णयांवर १४ वेळा आक्षेप नोंदवले होते. या कथित आक्षेपांमध्ये मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे किंवा समाविष्ट करणे तसेच मतदार डेटाबेसच्या प्रवेशासंबंधी मुद्द्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
या वृत्तानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसह काही विधानसभा निवडणुकांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. मतदारांच्या अधिकारांवर हल्ला करून लोकशाहीचे नुकसान करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली.
#WATCH बिहार | पटना में मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश कुमार के खिलाफ विरोध प्रदर्शन कर रहे कांग्रेस कार्यकर्ताओं को तितर-बितर करने के लिए पुलिस ने वॉटर कैनन का इस्तेमाल किया। https://t.co/TomgaHseY1 — ANI_HindiNews (@AHindinews) September 25, 2026






