CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास...; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा
Abhijeet Dipke Demand Gyanesh Kumar Resignation: कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांत राजीनामा द्यावा, पण जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर, कॉकरोच जनता पार्टीकडून देशव्यापी आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.
अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जर ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर कॉकरोच जनता पक्ष (सीजेपी) २ ऑक्टोबर, गांधी जयंतीपासून एक मोठे आणि तीव्र देशव्यापी आंदोलन सुरू करेल, असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
अभिजीत दीपके म्हणाले की, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात होईल. मुंबईतील भव्य आंदोलनानंतर, ही मोहीम देशभरातील इतर प्रमुख राज्ये आणि शहरांमध्ये विस्तारली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, अभिजीत दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये “या गांधी जयंतीनिमित्त लोकशाही वाचवण्याची शपथ घेऊया.” असे आवाहनही केले आहे.
अभिजीत दिपके यांनी आपल्या पोस्टमधून तीन मागण्या केल्या आहेत.
ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. ही त्यांची पहिली मागणी आहे.
देशभरातली सर्व राज्यातील सर्व आगामी निवडणुका तातडीने स्थगित कराव्यात. जानेवारी २०२४ ची मतदार यादी तात्काळ प्रभावाने पुनर्संचयित करावी आणि एसआयआर प्रक्रियाही तातडीने थांबवण्यात यावी, अशी त्यांची दुसरी मागणी आहे.
निवडणूक आयुक्तांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणारा २०२३ चा कायदाही तातडीने रद्द करावा. नागरी समाजाचा समावेश असलेला एक नवीन कायदा लागू करावा, अशी सीजेपीने तिसरी मागणी केली आहे.
मतदार यादीशी संबंधित काही निर्णयांवरून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.’द इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या निर्णयांवर आणि आदेशांवर किमान १४ लेखी आक्षेप दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सुऱबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांचे आक्षेप डावलून निर्णय किंवा आदेश त्यांच्या माहितीशिवाय किंवा मंजुरीशिवाय जारी करण्यात आले होते. इतकेच नाही, तर एकाच दिवशी चार आक्षेप दाखल करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
कायद्यानुसार, निवडणूक आयोगाच्या कामकाजात शक्य असेल तेव्हा एकमत साधले पाहिजे आणि मतभेद झाल्यास बहुमताचा निर्णय स्वीकारला पाहिजे. या व्यवस्थेच्या असूनही, दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. याचवरून संपूर्ण देशात ज्ञानेश कुमारांविरूद्ध संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.






