Congress Sufian Haider potholed road renames in Mumbai as Devendra Fadnavis Marg Video Viral
मुंबई : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर शहरी लोकांचे मात्र कंबरडे मोडले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसामध्ये रस्ते अक्षरशः वाहून गेले आहेत. मुंबईमध्ये रस्त्याची चाळण झाली असून यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भररस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे असून यामध्ये पाणी साचले आहे. याचे अनेक धक्कादायक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यानंतर आता मुंबईमधील एका रस्त्याचे नाव चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्ग असे करण्यात आले आहे.
मुंबईमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. दुचाकी चालकांना याचा मोठा फटका बसला आहे. तर चार चाकी चालकांच्या गाड्या या खड्ड्यांमध्ये अडकत आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून यामुळे त्याचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक अपघात देखील होताना दिसत आहे. याचा विरोध म्हणून कॉंग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेतला गेला. मुंबईतील रस्त्याचे कॉंग्रेकडून नामांतर करण्यात आले आहे. खड्डेमय रस्त्याला देवेंद्र फडणवीस मार्ग असे नाव देण्यात आले आहे. याचा नामांतरच्या बोर्डाला हार घालण्यात आला असून यावेळी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
व्हायरल व्हिडिओमध्ये कॉंग्रेस नेते सुफियान हैदर यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून बीएमसीच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि सर्व प्रशासकीय अधिकार थेट मुख्यमंत्र्यांकडे आहेत, तरीही मुंबईतील रस्त्यांची स्थिती बिकट होत चालली आहे. बीएमसीचे वार्षिक बजेट अंदाजे ₹७४,००० कोटी आहे, ज्यामध्ये रस्ते दुरुस्तीसाठी ₹३,५०० कोटी, पूल बांधकामासाठी ₹४,००० कोटी आणि प्रत्येक वॉर्डमधील खड्डे भरण्यासाठी ₹५० लाखांचा समावेश आहे. इतके मोठे बजेट असूनही, मुंबईतील नागरिकांना अजूनही खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून चालावे लागत आहे, ही शोकांतिका असल्याची खंत कॉंग्रेस नेते सुफियान हैदर यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुफियान हैदर यांनी या निधीचा योग्य वापर का केला जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी बीएमसीने रस्ते बांधकामासाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) लागू करण्याची मागणी त्यांनी केली. हैदर म्हणाले की, जर चीन आणि जपानसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असू शकतात, तर मुंबईत हे का शक्य नाही? राज्य सरकार आणि बीएमसीवर निष्काळजीपणाचा आरोप करत ते म्हणाले की दरवर्षी अपघात होतात आणि खराब रस्त्यांमुळे लोकांचे प्राण जातात. ते असेही म्हणाले की निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांना विकास आठवतो, परंतु सामान्य लोकांना नेहमीच फक्त आश्वासने आणि खड्डे भरलेले रस्ते मिळतात, असा टोला हैदर यांनी लगावला आहे.