एकनाथ शिंदे त्यांच्याच मंत्र्यांवर नाराज
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्प्णी केली जात आहे. त्यानंतर आता महायुतीतच मोठ्या घडामोडी होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांच्या केबिनमध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी जमिनीवर काम करण्याचे आणि सार्वजनिक प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांची कानउघाडणी केली आहे. अकार्यक्षम मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांना सुनावल्याची माहिती आहे. मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. पक्ष संघटनेसाठी वेळ न देणाऱ्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी झापलं.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर, मात्र पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम
दरम्यान, महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री सर्वाधिक वादग्रस्त राहिले आहेत. त्याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
सर्वांनी आत्तापासूनच तयारीला लागावे
येत्या काही दिवसांत राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. सर्वांनी आतापासूनच तयारी सुरू करावी. यापूर्वी, अजित पवार यांनी नागपुरात झालेल्या विचारमंथन सत्रात योग्य कामगिरी केली नाही तर त्यांनी त्यांची पदे सोडावीत, अशा शब्दांत त्यांच्या मंत्र्यांना फटकारले होते.
महायुतीमध्ये सर्व काही ठीक नाही
महायुतीमध्ये सर्व काही ठीक नाही, असे यावरून दिसून येत आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट मोठ्या वादात अडकले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका हटिलच्या लिलावाच्या वादानंतर, त्यांच्या घरी नोटांनी भरलेल्या बंगसह बसलेला व्हिडिओही व्हायरल झाला. अजित पवार गटाचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईलवर रमी खेळताना पकडले गेले.
शिवसेना मंत्र्यांची झाली बैठक
मंत्रिमंडळ बैठकीचे ठिकाण असलेल्या निर्मल भवन येथे नुकतीच शिवसेना मंत्र्यांची गुप्त बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या प्रशासकीय शैली आणि पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करण्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती दिली जात आहे.