ठाणे : राज्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी होत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये अनेक घडामोडी झाल्या आहेत. दारूण पराभवाचे खापर मित्रपक्षांवर फोडले जात आहे. यामध्येच आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे.
विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागला. शरद पवार गट, कॉंग्रेस व ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाच वेळा भेट घेतली आहे. तर दुसऱ्याबाजूला ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे. यावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना मला रोज शिव्या दिल्या जात होत्या. माझ्यावर उठसूट आरोपही केले जात होते. मलाच नव्हे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या थरावर आरोप केले. फडणवीस यांना तुरंगात टाकण्याचे प्रयत्न केले. तू राहील मी राही अशी भाषा केली. अजून काय काय बोलले मी ते सांगू शकत नाही. पण आता पाहा काय बदल झाला? काय जादू झाली? सरडे रंग बदलतात. पण एवढे फास्ट वेगाने रंग बदलणारे सरडे मी पाहिले नाहीत,” असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरे यांनी स्मराकाच्या पाहणीवेळी एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांचे विचार मानणारे येतील. त्यांचे विचार सोडणाऱ्यांचा संबंध नाही, अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. ठाकरेंच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. “ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असं ते म्हणाले. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? बाळासाहेबांचं स्मारक कोण बांधतोय? सरकार बांधतंय. बाळासाहेबांचं स्मारक हे कुणाच्या मालकीचं नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
राजकारणात नवा भूकंप होणार?
राज्याच्या राजकारणामध्ये नवीन युती पाहायला मिळणार का याची उत्सुकता लागली आहे. महाविकास आघाडी ही तुटलेली आहे. ठाकरे गटाने कार्यकर्त्यांना संधी दिली जावी असे म्हणत स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी ठाकरे गट नागपूर ते मुंबई महापालिका निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. याचबरोबर शरद पवार यांनी देखील भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या आहेत. तर एकनाथ शिंदे हे जास्त राजकारणामध्ये दिसत नसून विकासकामांवर लक्ष देताना दिसत आहे. यामुळे आता राज्यामध्ये कोणता राजकीय गौप्यस्फोट होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.