हरिभाऊ बागडे यांना देशाचे पुढचे राष्ट्रपती करण्यात यावे अशी मागणी राज्यातील भाजप नेते नितीन गडकरींकडे करत आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : भारताच्या राष्ट्रपतीपदी मराठी माणसाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. भाजप नेते आणि सध्याचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याबाबत ही चर्चा सुरु आहे. हरिभाऊ बागडे यांनी नुकतीच राजस्थान राज्यपाल पदाची धुरा सांभाळली. बागडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी भाजप नेत्यांनी आता त्यांची राष्ट्रपती पदासाठी वर्णी विनंती नितीन गडकरी यांच्यासमोर व्यक्त केली आहे.
हरिभाऊ बागडे हे भाजप नेते सध्या राज्यस्थानच्या राज्यपाल पदाची धुरा यशस्वीरित्या पार पाडत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये भाजप नेते अतुल सावे देखील उपस्थित होते. यावेळी अतुल सावे यांनी हरिभाऊ बागडे यांच्या कार्याचा उल्लेख करत आता त्यांना राष्ट्रपती करण्यात यावं अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
कार्यक्रमामध्ये अतुल सावे यांनी हरिभाऊ बागडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी अतुल सावे म्हणाले की, हरिभाऊ बागडे यांनी आपल्या सख्ख्या जावयाला देखील नोटीस पाठवली होती. आम्ही रोज सोबत जेवायचो, पण आमची लक्षवेधी लावा अशी विनंती केल्यावर देखील हरिभाऊ बागडे म्हणायचे जेव्हा नंबर येईल तेव्हा लक्षवेधी, त्यामुळे त्यांनी कायम कामावर आणि त्यांच्या कर्तव्यावर ठाम राहिले. नितीन गडकरी यांना काही जणांची विनंती आहे की, हरिभाऊ बागडे यांचा विचार राज्यपालनंतर राष्ट्रपतीसाठी व्हावा, अशी मागणी अतुल सावे यांनी सोहळ्यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
कोण आहेत हरिभाऊ बागडे?
डोक्यावर गांधी टोपी आणि अगदी साधी राहणीमान असलेले हरिभाऊ बागडे औरंगाबादचे नेते आहे. कष्ट करुन आणि हालाखीचे दिवस काढून त्यांनी राज्यपालपदापर्यंत प्रवास केला आहे. हरिभाऊ बागडे यांनी मागील 65 वर्षांपासून त्यांनी आरएसएसमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर आमदार, मंत्री आणि आता थेट राजस्थानचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे कार्यरत होणार आहेत. बागडे यांनी 1985 ला आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. पाच वेळी त्यांनी सलग आमदार म्हणन काम केले. त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड विधानसभा अध्यक्ष म्हणून झाली. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून देखील हरिभाऊ बागडे यांनी कार्यभार सांभाळला आहे. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. आता त्यांचा राष्ट्रपती म्हणून विचार व्हावा अशी मागणी अतुल सावे यांनी केली आहे.