सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल; निलेश राणेंचा ३२ जागांवर दावा! (Photo Credit- X)
Sindhudurg ZP Election: राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती असली तरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पावशी येथील मेळाव्यात ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना स्वबळावर लढणार’ असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिंदे गटाने एकट्याने लढण्याचा नारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषदेच्या एकूण ५० पैकी ३२ जागांवर आपला हक्क असल्याचे जाहीर केले आहे. निलेश राणे यांनी ठामपणे सांगितले की, “जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींवर भगवा फडकवण्यात कोणतीही अडचण नाही. उमेदवार कोणताही असो, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल.”
पावशी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना निलेश राणे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर १०० टक्के शिवसेनेचा भगवा फडकवून, नारायण राणे साहेबांना अपेक्षित असलेला कारभार आम्ही करू.” ते पुढे म्हणाले, “जिल्हा परिषदेत गेल्या २७ वर्षांपासून खासदार नारायण राणेंच्या विचारसरणीची सत्ता आहे, पण आता आमच्या दोन आमदारांच्या (निलेश राणे आणि नितेश राणे) पाठिंब्याने आम्ही थेट ३२ जागांवर दावा करत आहोत.”
यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर दबाव टाकत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत निलेश राणे विरुद्ध त्यांचे बंधू नितेश राणे (भाजप) हे दोन भाऊ आमनेसामने येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “शिवसेना संघटनेच्या ताकदीवर विश्वास ठेवा. भगवा फडकवणे आपल्या हातात आहे आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करेल.”






