
Eknath shinde
मुंबई : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपांमुळे देशभरात एकाच खळबळ उडाली आहे. देशभरातील राजकीय वातावरण राहुल गांधींच्या आरोपांनंतर चांगलंच तापलं आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून काँग्रेससह INDIA आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही राहुल गांधींच्या आरोपांवर प्रत्युत्तर देत टीका करायला सुरुवात केली आहे. (Eknath Shinde On Rahul Gandhi)
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप केल्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधत राहुल गांधी यांना ‘मोदी फोबिया’ने पछाडले असून ते प्रसिद्धीसाठी असे आरोप करत असल्याची टीका शिंदे यांनी केली.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गांधी यांच्यावर एक्स पोस्टमधून टीका केली. एक्स पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, “राहुल गांधी यांना सध्या ‘मोदी फोबिया’ने इतके पछाडले आहे की त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र मोदीजीच दिसतात. सत्य हेच आहे की, जोपर्यंत ते पंतप्रधानांचे नाव घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची बातमीही होत नाही आणि माध्यमांच्या चर्चेतही ते टिकू शकत नाहीत.”
“स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आता राहुल गांधी ‘फोन टॅपिंग’सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करत आहेत. ना कोणता ठोस मुद्दा, ना विकासाचे व्हिजन, ना दाव्यांच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा! फक्त खिशात पुरावे असल्याच्या पोकळ बाता मारायच्या, हवेत तीर सोडायचे आणि रोज नवा ‘फेक नॅरेटिव्ह’ रचायचा, हाच त्यांचा आता ‘फुल-टाइम’ उद्योग झाला आहे,” अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
पुढे ते म्हणाले, “एकीकडे देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रगतीचे नवे शिखर गाठत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेते मात्र अशा हास्यास्पद विधानांनी स्वतःचेच हसे करून घेत आहेत. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण आज त्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते,” असा टोलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गांधी यांना लगावला.
एकूणच, फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि सत्ताधारी नेत्यांमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर केंद्र सरकारकडून काय प्रतिक्रिया येते आणि काँग्रेसकडून शिंदेंच्या टीकेला काय उत्तर दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Ans: राहुल गांधी यांना 'मोदी फोबिया'ने पछाडले असून प्रसिद्धीसाठी ते फोन टॅपिंगसारखे आरोप करत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
Ans: केंद्र सरकारकडून आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच आपल्या फोनमध्ये आरोपांचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला.
Ans: राहुल गांधी दररोज नवे आरोप करून राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण करत असल्याचा दावा शिंदे यांनी केला. फोन टॅपिंगच्या आरोपांवरून त्यांनी ही टीका केली.