
nana patole on rahul gandhi
मुंबई : देशाच्या राजकरणातील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. आधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये रोजच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल केला असून केंद्र सरकारवर फोन टॅप केला जात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. (Rahul Gandhi)
त्यामुळे देशाच्या राजकारणात फोन टॅपिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. राहुल गांधींच्या या दाव्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला असून काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनीही याबाबत मोठा खुलासा केला आहे.
नाना पटोले यांनी ‘माझाही फोन टॅप करण्यात आला होता,’ असा दावा करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या फोनमध्ये त्यांच्या सर्व आरोपांचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारकडून आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या आरोपानंतर काँग्रेस नेत्यांकडूनही सरकारला घेरण्यास सुरुवात झाली आहे.
राहुल गांधींचे आरोप खोटे नसून वस्तुस्थिती असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या काळात आपलाही फोन टॅप करण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला.
नाना पटोले यांनी यावेळी रश्मी शुक्ला यांचे नाव घेत आपला फोन टॅप झाल्याचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना केंद्रात पाठवण्यात आले आणि त्यानंतर भाजप सरकारच्या काळात पुन्हा महाराष्ट्रात आणून डीजी पदावर मुदतवाढ देण्यात आली, असा दावाही त्यांनी केला. विरोधकांचे फोन टॅप करून त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याचे राजकारण भाजप करत असल्याचा घणाघात पटोले यांनी केला. हे आरोप राजकीयदृष्ट्या गंभीर असून यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर पुढे येऊन उत्तर द्यावे आणि देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. या प्रकरणात सुधारणा झाली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य केले. यापूर्वी पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून विरोधी नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय स्तरावर समोर आल्याचा उल्लेख त्यांनी केला. मोठ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी उच्चस्तरीय परवानगी आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
एकीकडे राहुल गांधींचे आरोप, तर दुसरीकडे नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांची वक्तव्ये यामुळे फोन टॅपिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता या आरोपांवर केंद्र सरकार आणि भाजपकडून काय उत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Ans: केंद्र सरकारकडून आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच आपल्या आरोपांचे पुरावे फोनमध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला.
Ans: माझाही फोन टॅप करण्यात आला होता, असा दावा नाना पटोले यांनी केला. यासाठी त्यांनी रश्मी शुक्ला यांचे नाव घेतले आणि तत्कालीन महाराष्ट्र सरकारमधील सत्ताधाऱ्यांवर आरोप केले.
Ans: पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून विरोधी नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या बातम्यांचा उल्लेख करत त्यांनी फोन टॅपिंगसाठी उच्चस्तरीय परवानगीचा मुद्दा उपस्थित केला.