
Municipal Elections : नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; मतदारांमध्ये तीव्र नाराजी
नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीचे मतदान आज घेतले जाणार आहे. पुणे, नागपूर, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडत आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत. त्यातच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. असे असले तरी मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहरातील काही मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागली. राज्यातील महापालिकांच्या या निवडणुकीत एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबई, नागपूर, ठाणे व पुण्यातील लढतींवर तर भाजप-शिवसेना विरोधात ब्रँड ठाकरे असा जंगी सामना रंगणार आहे. तर, उपराजधानी नागपुरात विजय मिळवणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का! माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी
पुणे, नागपूरसह नाशिकमध्ये महापालिकेची निवडणूक होत आहे. नाशिकमध्ये एकूण 122 जागांसाठी आज मतदान होत असून, यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. मतदान यंत्रे आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले होते. निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या सुरुवातीलाच ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला.
पुण्यातही प्रशासनाकडून तयारी पूर्ण
पुणे महानगरपालिकेसाठी (PMC Elections 2026) गुरुवारी (दिनांक 15) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पुणे शहरावर (Pune News) वर्चस्व ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांमध्येच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. मतदान प्रक्रियेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.