
इचलकरंजीत पहिल्यांदाच होतीये महानगरपालिकेची निवडणूक; भाजप-शिवसेनेत जागावाटपाची चर्चा सुरु
इचलकरंजी : महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, हालचाली गतिमान होत आहेत. याच अनुषंगाने आमदार राहुल आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्यात दीड तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यामध्ये भाजप-शिवसेना युती म्हणून एकत्र लढत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासह पहिला महापौर हा महायुतीचाच करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्वबळाच्या हालचाली सुरु असल्या तरी त्यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना महायुतीत घेण्यात निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्यात उत्साह निर्माण झाला आहे. या पहिल्याच निवडणुकीत आपलीच सत्ता आणि आपलाच महापौर यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून दावा केला गेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी मातोश्री भवन येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांची भेट घेतली. यावेळी चर्चेत सद्यस्थितीत येथील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरु केली आहे.
हेदेखील वाचा : ‘…म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही’; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान
भाजप आणि शिवसेनेचे २-२ प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या प्रमुखांशी संपर्क करून चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये सफलता न मिळाल्यास भाजप आणि शिवसेना युती करून निवडणुकीला सामोरे जायचे आणि पहिला महापौर करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. एकूणच राजकीय घडामोडीना गती आली आहे. दरम्यान, उमेदवारी मिळवण्यासाठी नेतेमंडळींची मनधरणी करून फिल्डिंग लावण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयात इच्छुकांसह कार्यकर्त्यांचीही गर्दी दिसत आहे.
इच्छुक उमेदवारांचे दौरे सुरु
कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. मागील काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये संपर्क दौरे, सामाजिक उपक्रम, विकासकामांचे फलक, बॅनर आदी माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, अचानक निवडणूक जाहीर झाल्याने आणि आचारसंहिता लागू झाल्याने या सर्व हालचालींना ब्रेक लागला असून, इच्छुकांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसत आहे.
हेदेखील वाचा : Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात; ‘या’ प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा