
Pimpri News : माजी नगरसेवक राहुल कलाटे आज करणार भाजपमध्ये प्रवेश
पिंपरी / अमोल येलमार : माजी नगरसेवक राहुल कलाटे आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे भाजपची शहरातील ताकद आणखी वाढणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
राहुल कलाटे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढवत विजयी उमेदवाराला तगडे आव्हान दिले होते. कलाटे यांनी मिळवलेले मताधिक्य आणि जनाधार शहरभर चर्चेचा विषय ठरला होता. चिंचवड विधानसभा तसेच पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचे मोठे संघटनात्मक जाळे आहे.
कलाटे यांचे अनेक समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आज होणारा अधिकृत प्रवेश हा केवळ औपचारिकता मानली जात आहे. विशेषतः वाकड प्रभाग क्रमांक २५ मध्ये या प्रवेशाचा मोठा राजकीय परिणाम होणार असून तेथील इच्छुक उमेदवारांच्या राजकीय गणितांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : Akluj Municipal Council Election: अकलूज नगर परिषद निवडणुकीत बुलेटची पैज अंगलट; भाजप कार्यकर्त्याचा मोबाईल स्विच ऑफ
राहुल कलाटे यांचा राजकीय प्रवास शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भारतीय जनता पार्टी असा राहिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून भाजपसाठी हा प्रवेश ‘गेमचेंजर’ ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रवेश भाजपला निश्चितच बळ देणारा ठरेल, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
पुण्यातही होत आहेत प्रवेश
महानगरपालिका निवडणूक रंगू लागली आहे. अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश होत आहे. असे असताना आता प्रभावशाली नेते सुरेंद्र पठारे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे वडगाव शेरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, भाजपाला थेट आणि मोठा फायदा होणार असल्याचे चित्र आहे.
हेदेखील वाचा : Eknath Shinde News: भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार; स्वबळावर लढत देत शिंदे शिवसेनेचा मोठा स्ट्राइक रेट