
Gokul milk Bombay HC satej Patil Hasan Mushrif
Gokul Chairmen Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणात आता चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. संचाला मंडळाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागांवर बाजी मारली. तर, महायुतीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे गोकुळचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र राज्य सरकारने चार सरकारी संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचं अधिकार दिला. यामुळे अध्यक्षपद निवडीचं गणिताचं बदललं आहे.
निवडणुकीनंतर सतेज पाटील यांच्या आघाडीकडेच अध्यक्षपद जाणार अश्या चर्चा रंगल्या असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सगळा गेमच फिरवला असल्याचं बोललं जात आहे. सरकारनियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे महायुतीचे पारडं जाड झालं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच काल (रविवार, 9 नोव्हेंबर) कोल्हापुरात सरकारविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला.
आज सकाळी 11 वाजता शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. त्याआधी महायुतीमध्ये अध्यक्षपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना सव्वा-सव्वा वर्ष अध्यक्षपद देण्याचे नियोजन असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदा राष्ट्रवादी, त्यानंतर भाजप आणि शेवटी शिंदेसेनेला संधी मिळू शकते. उर्वरित कालावधीत जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष असेल, अशीही चर्चा आहे.
विशेष म्हणजे, अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असतानाच पहिल्यांदा अध्यक्ष होण्यासाठी महायुतीतील नेत्यांमध्ये फारसा उत्साह दिसत नसल्याची माहिती आहे. सध्या महायुतीविरोधात वातावरण असल्याने अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना नेते सावध भूमिका घेत असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणजीतसिंह पाटील यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ते माजी आमदार के. पी. पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्यासोबत माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, भाजपकडून अंबरीष घाटगे आणि डॉ. चेतन नरके यांची नावे पुढे येत आहेत. तर शिंदेसेनेकडून अजित नरके यांच्या नावाची चर्चा होती. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने शशिकांत चुयेकर यांना आधीच उमेदवार म्हणून पुढे केले आहे.
या निवडणुकीत 25 निवडून आलेले संचालक आणि चार शासननियुक्त संचालक असे एकूण 29 जण मतदान करणार आहेत. शासननियुक्त संचालकांसाठी स्वतंत्र मतपेटी ठेवण्यात येणार असून संपूर्ण मतदान प्रक्रियेचं छायाचित्रणही केलं जाणार आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरगाव येथील गोकुळ कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महायुती आणि समविचारी आघाडीच्या समर्थकांसाठी पोलिसांनी स्वतंत्र जागा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे आजच्या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार आणि गोकुळच्या सत्तेची सूत्रं कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे.
Ans: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी 10 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे.
Ans: भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सव्वा-सव्वा वर्ष अध्यक्षपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यानंतर उर्वरित कालावधीत जनसुराज्य पक्षाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
Ans: राष्ट्रवादीकडून रणजीतसिंह पाटील आणि राजेश पाटील, भाजपकडून अंबरीष घाटगे आणि डॉ. चेतन नरके, तर शिंदेसेनेकडून अजित नरके यांच्या नावांची चर्चा आहे. समविचारी आघाडीकडून शशिकांत चुयेकर यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.