रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, ‘माझं तोंड उघडायला भाग पाडू नका’, असा थेट इशाराच दिला आहे. (Rohit Pawar vs Jaykumar Gore)
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे बालाजी सरोवर येथे बैठका घेत असल्याचा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ बैठका घेऊन ते काम करत आहेत, असा उल्लेख करत त्यांनी गोरेंवर टोला लगावला.
‘कष्ट जास्त झाले की माणूस गोळ्या खातो’, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
रोहित पवारांच्या टीकेनंतर जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत थेट प्रत्युत्तर दिलं. माझा राजकीय जीवनातील संघर्ष मोठा आहे. मी शरद पवारांचा नातू नाही किंवा कोणत्या उद्योगपतीचा मुलगा नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असं गोरे म्हणाले.
आजोबा आणि चुलत्याचं नाव घेऊन राजकारण करत नाही. एक-दोनदा नव्हे, तर चार वेळा निवडून आलो आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.
पुढे बोलताना गोरे म्हणाले की, माझ्याकडून काही चूक होत असेल तर माझ्यावर जरूर टीका करा. मात्र टीका करताना पातळी सोडली, तर मलाही त्याच पातळीवर जाऊन उत्तर देता येतं. ‘माझं तोंड उघडायला भाग पाडू नका, कारण माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांना इशारा दिला.
या वक्तव्यांमुळे रोहित पवार आणि जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय वाद आता अधिक चर्चेत आला आहे. सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या कामकाजावरून सुरू झालेली टीका आता दोन्ही नेत्यांच्या राजकीय पार्श्वभूमीपर्यंत पोहोचली आहे. आता रोहित पवार या इशाऱ्याला काय उत्तर देतात आणि हा वाद पुढे कोणतं वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Ans: सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठका आणि कामकाजावरून रोहित पवार यांनी टीका केली होती. त्यानंतर जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिल्याने हा वाद चर्चेत आला.
Ans: 'माझं तोंड उघडायला भाग पाडू नका, कारण माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे', असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना इशारा दिला.
Ans: स्वतःच्या वक्तव्यात जयकुमार गोरे यांनी आपण चार वेळा निवडून आल्याचा उल्लेख केला आहे.






