
Idris Naikwadi with ajit pawar
राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता असून यावरून राजकीय वारे वेगाने फिरू लागले आहेत. यावरूनच आता खळबळजनक बातमी समोर येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारालाच जीवे मारण्याची धमकी आली आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार इद्रिस नायकवाडी यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
‘समान नागरी कायद्याला विरोध केल्यास तुम्हाला खलास करू,’ अश्या आशयाचे पत्र त्याना मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मिरज शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार इद्रिस नायकवाडी यांनी या मुद्द्यावर पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती. गेल्या महिन्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून समान नागरी कायद्याबाबत पक्षाची भूमिका जाहीर करण्याची विनंती केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचारांचा पक्ष असल्याचे नमूद करत, आगामी हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याशी संबंधित विधेयक मांडले जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते. त्यामुळे सरकारच्या संभाव्य निर्णयाबाबत पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी त्यांची मागणी होती. या मागणीनंतर धमकीचे पत्र मिळाल्याचे नायकवाडी यांनी सांगितले. या पत्रामागे नेमके कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
धमकीच्या पत्रानंतर आमदार नायकवाडी यांनी मिरज शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, दिवंगत नेते अजित पवार यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, धर्मनिरपेक्षता आणि छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेत सातत्याने केला जात होता.
अजित पवार यांच्या निधनानंतर इद्रिस नायकवाडी यांच्या राजीनाम्याबाबत पक्षातील वरिष्ठांकडून विचारणा झाल्याचे वृत्तही यापूर्वी चर्चेत आले होते. मात्र, आपल्याला राजीनाम्याबाबत कोणतीही विचारणा झाली नसल्याचे आणि आपण राजीनामा देणार नसल्याचे नायकवाडी यांनी स्पष्ट केले होते.
आता समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून त्यांनी पक्षाकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, धमकीच्या पत्राचा आणि पक्षातील कथित मतभेदांचा थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Ans: समान नागरी कायद्याला विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याचा दावा आमदार नायकवाडी यांनी केला आहे.
Ans: त्यांनी मिरज शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पत्र पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून समान नागरी कायद्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली होती.