
uddhav thackeray on satej patil
Kolhapur Golkul Politics : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा सत्तासंघर्ष आता आणखी रंगात आला आहे. आधीच चार संचालकांच्या नियुक्तीवरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असताना आता या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचीही एन्ट्री झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना थेट फोन करत आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षात सतेज पाटील यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुकीत मिळालेला जनादेश डावलून शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून सत्तेचं गणित बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ‘लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असा विश्वास त्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या लढाईला आता केवळ कोल्हापूरपुरतं मर्यादित न राहता राज्यव्यापी राजकीय स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत बहुमत आणि कोरमचा प्रश्न निर्माण झाला.
यानंतर राज्य सरकारने चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांच्या मते, हा निर्णय म्हणजे निवडणुकीत मिळालेला कौल बदलण्याचा प्रयत्न आहे.
या प्रकरणात आता न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे. दुसरीकडे, सतेज पाटील यांनी ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या निर्णयावरून शिंदे गटातील नाराजीचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे गोकुळच्या मुद्द्यावर महायुतीमध्येही मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना दिलेला पाठिंबा या संघर्षाला किती बळ देणार आणि सरकार यावर काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात
Ans: गोकुळ दूध संघात चार शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयाला सतेज पाटील यांनी विरोध केला आहे. लोकशाही पद्धतीने मिळालेला कौल डावलला जात असल्याची त्यांची भूमिका आहे. या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे.
Ans: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या.
Ans: सतेज पाटील यांनी 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.