
विदर्भात मतदारांमध्ये दिसून आला निरुत्साह; सरासरी ५७.६२% झाले मतदान
नागपूर : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (दि.15) मतदान पार पडले. मतदारांमध्ये कुठं उत्साह तर कुठं निरूत्साह दिसून आला. नागपुरात महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये सकाळपासून निरुत्साह दिसत होता. तो दुपारपर्यंत कायम होता. मात्र, सायंकाळी अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. चंद्रपुरात दोन महिला उमेदवारांच्या पतीमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्या लाठीमार करावा लागला.
अकोला येथील एका मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. दुपारी ३.३० पर्यंत नागपुरात ४२ टक्के, अकोला येथे ४३.३५ टक्के, अमरावतीत ४०.६२ टक्के तर चंद्रपुरात ३८.१२ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या तीनही महापलिकेत सरासरी ५७.६२ टक्के मतदान झाले. अमरावती येथे सकाळपासून मतदानाची संथगती दिसत होती. मतदार यादीतील गोंधळाचा अनेकांना फटका बसला.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: ‘या’ महानगरपालिकेत क्रॉस व्होटिंगची चर्चा; धक्कादायक निकालाची शक्यता
दरम्यान, एकाच घरातील मतदान दोन वेगवेगळ्या प्रभागात असल्याचे दिसून आले. तर प्रभाग क्रमांक १२ मधील नरसम्मा कॉलेज येथे जाणीवपूर्वक वोटिंग मशीन उलट्या क्रमात लावण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी एका व्हिडिओद्वारे केला. सांयकाळी मात्र मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र होते.
अकोल्यात मतदान केंद्रावर मतदाराचा मृत्यू
अकोला येथील प्रभाग क्र. १८ मधील शहाबाबू हायस्कूल मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या एका वृद्ध मतदाराचा मृत्यू झाला. गौतम गरड (वय ६२) असे मृताचे नाव आहे. ते सकाळी ११.३० वाजता मतदान केंद्रवर मतदानासाठी आले होते. मात्र, केंद्र परिसरात अचानक खाली कोसळले. पोलिस आणि उपस्थित नागरिकांनी त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगण्यात आले.
चंद्रपूरमध्ये महिला उमेदवारांच्या पतीमध्ये हाणामारी
महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना एकोरी प्रभागातील नेहरू शाळा मतदान केंद्रावर दोन महिला उमेदवारांच्या पतीमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रात आणली. अपक्ष उमेदवार दीप कासट यांचे पती ललित कासट आणि भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष राशीद हुसेन यांच्यात वाद झाला. या वादचे पर्यावसान हाणामारीत झाले. परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे काही काळ मतदान प्रभावित झाले.
हेदेखील वाचा : BMC-Maharashtra Municipal Election Result 2026 Live: महापालिकांचा फैसला आज! २९ शहरांत कोणाची सत्ता?